JD Vance : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. यावेळी उपराष्ट्राध्यक्ष म्हणून जेडी व्हान्स यांनी शपथ घेतली. मागच्या १०० वर्षांच्या इतिहासात अमेरिकेला दाढी असलेले पहिले उपराष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. त्यामुळे त्यांची चर्चा सोशल मीडियावरही रंगली आहे.
अमेरिकेचा इतिहास काय सांगतो?
१९३३ मध्ये चार्ल्स कार्टिस हे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष होते ज्यांना मिशा होत्या. त्यानंतर आजपर्यंत एकही उपराष्ट्राध्यक्ष मिशी असलेला नव्हता. तर १९०५ ते १९०९ या थिओडोर रुझवेल्ट याच्या प्रशासनात चार्ल्स फेअरबँक्स हे उपराष्ट्राध्यक्ष होते ज्यांना जेडी व्हान्स यांच्यासारखी दाढी होती. त्यानंतर दाढी असेलेले उपराष्ट्राध्यक्ष म्हणजे जेडी व्हान्स (JD Vance ).
जेडी व्हान्स हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी
जेडी व्हान्स ( JD Vance ) हे ४० वर्षीय सिनेटर आहेत जे डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे सहकारी आहेत. अमेरिकेत उपराष्ट्राध्यक्षपद इतक्या कमी वयात भुषवणारे ते तिसरे तरुण आहेत. ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटीच्या २०१५ च्या एका सर्वेक्षणानुसार, मतदार सहसा दाढी आणि मिशा असलेल्या पुरुषांना लष्कर, बळाचा वापर ज्या ठिकाणी होतो तिथले अधिकारी या रुपात पाहणं पसंत करतात. डेक्कन हेराल्डने हे वृत्त दिलं आहे.
जेडी व्हान्स कोण आहेत?
अमेरिकेच्या निवडणुकीत रिपब्लिक पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी जेडी व्हान्स यांना उपराष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून निवडलं होतं. जेडी व्हान्स हे अमेरिकेतील ओहियो राज्याचे सिनेटर आहेत. २०२२ मध्ये अमेरिकेच्या सिनेटने सिनेट सदस्य म्हणून जेडी यांची निवड केली होती. ३ जानेवारी २०२३ ला त्यांना शपथ देण्यात आली. आता ते अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष आहेत.
संघर्ष लहान असल्यापासूनच वाट्याला
जेडी ( JD Vance ) यांचा जन्म १९८४ मध्ये ओहियो राज्यातील मिडलटाउन या शहरात झाला. व्हान्स यांची आई बेवर्ली वेब एकिन्स यांनी एकूण पाच लग्नं केली होती. ( JD Vance ) जेडी हे बेवर्ली यांच्या दुसऱ्या पतीपासून झाले आहेत. बेवर्ली वेब एकिन्स यांनी १९७९ मध्ये जेडी यांची बहीण लिंडसेला जन्म दिला. त्यावेळी एकिन्स फक्त १९ वर्षांच्या होत्या. एकिन्स यांनी १९८३ मध्ये डोनाल्ड वोमेन यांच्याशी दुसरं लग्न केलं. त्यांच्यापासून एकिन्स यांना जेडी हा मुलगा झाला. लिंडसे आणि जेडी हे दोघंही मिडलटाऊनमद्ये वाढले. एक काळ असाही आला होता की जेडी यांच्या कुटुंबातील लोकांची नोकरी गेली होती. त्यामुळे जेडी आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक चणचणही सहन करावी लागली. घरी आणि शाळेत भांडणं, वाद होणं ही बाब कायमच त्यांना सहन करावी लागली. जेडी जेव्हा सहा वर्षांचे होते तेव्हाच त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. या घटस्फोटाच्या काही वर्षे आधीच त्यांचे वडील डोनाल्ड यांनी घर सोडलं होतं.