न्यूयॉर्क : रिपब्लिकन पक्षातर्फे उपाध्यक्ष पदाचे उमेदवार जे. डी. व्हॅन्स यांनी डोनाल्ड ट्रम्प २०२०च्या निवडणुकीत पराभव झाला, हे कबूल करण्यास नकार दिला. ट्रम्प यंदाच्या निवडणूक निकालातून आव्हान देण्याचा प्रयत्न करतील की नाही, यावरही थेट उत्तर देण्याचे व्हॅन्स यांनी टाळले. उपाध्यक्षपदासाठीच्या ‘सीबीसी न्यूज’ने आयोजित केलेल्या चर्चेत मंगळवारी ओहायोचे सिनेटर असलेले व्हॅन्स आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार तथा मिनेसोटाचे गव्हर्नर टिम वॉल्झ सहभागी झाले होते.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या एक महिना आधी उपाध्यक्षपदासाठीही चर्चा सुरू झाली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प रिंगणात आहेत. दरम्यान, ६ जानेवारी २०२१ च्या बंडाळीच्या संदर्भात, प्रत्येक गव्हर्नरने निकाल प्रमाणित केले, तरीही ट्रम्प या वर्षी निवडणूक निकालांना पुन्हा आव्हान देतील का, असे विचारले असता व्हॅन्स यांनी त्याचे स्पष्ट उत्तर दिले नाही.

हेही वाचा >>> घडयाळ चिन्हाबाबत १५ ऑक्टोबरला सुनावणी; चिन्हाचा वापर करण्यास मनाई करण्याची न्यायालयाला विनंती

‘ट्रम्प यांनी म्हटले आहे की २०२० मध्ये विविध अडचणी होत्या आणि माझा स्वत:चा विश्वास आहे की त्या अडचणींना सामोरे गेले पाहिजे, त्यांच्याविरोधात संघर्ष केला पाहिजे, शिवाय सार्वजनिकरित्या त्या मुद्दयांवर शांततेने चर्चाही केली पाहिजे, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाल्याचे व्हॅन्स यांनी चर्चेदरम्यान नमूद केले. ते पुढे म्हणाले की ट्रम्प यांनी ६ जानेवारी रोजी निदर्शकांना शांततेने निषेध करण्यास सांगितले. २० जानेवारी रोजी जो बायडेन अध्यक्ष झाल्यावर ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडले होते. आता, दुर्दैवाने हॅरिस-बायडेन प्रशासनाच्या सर्व नकारात्मक धोरणांचा समाना करावा लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

विविध मुद्दयांवरून चर्चा

उपाध्यक्षपदाच्या चर्चेत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार टिम वॉल्झ यांनी व्हॅन्स यांना कोंडीत पकडले. वॉल्झ यांनी २०२० च्या निवडणुकीत ट्रम्प हरल्याबद्दल व्हॅन्स यांना प्रश्न विचारला. त्यावर ‘टिम, मी भविष्यावर लक्ष केंद्रित करत आहे, असे व्हॅन्स म्हणाले. हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नसल्याचे सांगून, ते निवडणूक हरले यावरून ही चर्चा नसल्याचे वॉल्झ यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन्ही उमेदवारांनी स्थलांतरण, बंदूक धोरण, हवामान बदल, गर्भपात आणि अर्थव्यवस्था यासारख्या मुद्दयांवरही वाद घातला.