राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आपल्या राष्ट्रीय कार्यक्रमापासून दूर जात असल्याबद्दल आघाडीचे निमंत्रक आणि संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष शरद यादव यांनी शुक्रवारी चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर एनडीएमधून बाहेर पडण्याबाबत आपल्या पक्षाने भारतीय जनता पक्षाला कोणताही इशारा दिलेला नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना यादव म्हणाले, राष्ट्रीय लोकशाही आघाडी सध्या तरी अस्तित्त्वात आहे. मात्र, आजपर्यंत ज्या राष्ट्रीय कार्यक्रमावर या आघाडीने वाटचाल केली तोच कार्यक्रम घेऊन पुढे गेले पाहिजे. गेल्या काही दिवसांत काही घडामोडी या आघाडीच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या विरोधात घडल्या. मोदी यांची भाजपच्या प्रचारप्रमुखपदी झालेली निवड हा त्या पक्षाचा अंतर्गत निर्णय आहे, हे आम्हाला मान्य आहे. मात्र, या निवडीनंतर भाजपच्या काही सदस्यांनी जे विचार व्यक्त केले, त्याला आमचा आक्षेप आहे. गोव्यामध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत झालेली काही भाषणे ही एनडीएच्या राष्ट्रीय कार्यक्रमाच्या विरोधात होती. त्याला आमचा निश्चितच आक्षेप आहे.
दरम्यान, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी शुक्रवारी शरद यादव यांची भेट घेऊन देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा केली.

Story img Loader