बिहारमध्ये जनता दल (युनायटेड) पक्षाचे नेते कैलाश महतो यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. कटिहार परिसरात त्यांच्यावर गोळीबार झाला. एका फार्मजवळ जदयूचे माजी जिल्हा सरचिटणीस कैलास महतो यांच्यावर मारेकऱ्यांनी गोळ्या झाडल्या.पोलिसांनी सांगितलं की, मारेकरी दुचाकीवरून कृषी फार्म चौक परिसरात पोहोचले. महतो यांच्याजवळ बाइक उभी केली आणि महतो यांच्यावर गोळ्यांच्या वर्षाव केला. यापैकी तीन गोळ्या त्यांना अशा ठिकाणी लागल्या की, काही क्षणात घटनास्थळीच महतो यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी सांगितलं, या प्रकरणातील आरोपी लवकरच पकडले जातील. कैलाश महतो यांना सार्वजनिक आरोग्य केंद्र बरारी येथे नेले असता तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं. कैलाश महतो यांनी आपल्या सुरक्षेबाबत भीती व्यक्त केली होती. त्यांनी संरक्षणदेखील मागितलं होतं.
पोलिसांनी महतो यांचा मृतदेह पंचनाम्यासाठी पाठवला आहे. कटिहारचे एसडीपीओ ओम प्रकाश यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला घटनेची माहिती दिली. पोलिसांनी सांगितलं की, महतो यांच्यावर अनेक राऊंड फायरिंग केल्यानंतर एक गोळी त्यांच्या कंठात घुसली, तसेच त्यांना दोन ते दीन गोळ्यांनी जबर जखमी केलं. पंचनाम्यानंतर कळेल की, त्यांना एकूण किती गोळ्या लागल्या होत्या,
महतो यांच्यावर गोळीबार केल्यानंतर मारेकरी हवेत गोळीबार करत तिथून फरार झाले. पोलीस त्यांच्या शोध घेत असून लवकरच हे मारेकरी गजाआड होतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, महतो यांना पाहण्यासाठी शेकडो लोक रुग्णलय परिसरात जमले आहेत.