संयुक्त जनता दल पक्षाचे नवनिर्वाचित खासदार देवेश चंद्र ठाकूर यांनी सीतामढी (बिहार) येथील एका कार्यक्रमादरम्यान वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ठाकूर म्हणाले, मी मुस्लिम आणि यादवांचं एकही काम करणार नाही. त्यांनी दावा केला आहे की, त्यांना नुकत्याच झालेल्या निवडणुकीत यादव समाज आणि मुसलमानांनी मतदान केलं नव्हतं. ठाकूर भर सभेत म्हणाले की “गेल्या २२ वर्षांच्या राजकारणात मी यादव आणि मुसलमानांची सर्वाधिक कामं केली. परंतु, निवडणुकीत या लोकांनी मला मतं दिली नाहीत. मला नाकारण्याचं कसलंही कारण नसताना त्यांनी मला मतं दिली नाहीत.”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ठाकूर म्हणाले, “या समाजातील लोक माझ्याकडे त्यांची कामं घेऊन आले तर मी नक्कीच त्यांना चहा-नाश्ता देईन. मात्र त्यांचं काम करणार नाही. ज्यांना त्यांची कामं घेऊन माझ्याकडे यायचंय त्यांनी यावं, मी त्यांना केवळ चहा-नाश्ता देईन. परंतु, त्यांनी माझ्याकडून कुठल्याही मदतीची अपेक्षा करू नये.” सीतामढीतून देवेश चंद्र ठाकूर यांनी विजय मिळवला आहे. ते यापूर्वी बिहार विधान परिषदेचे सभापती होते. ठाकूर हे सीतामढीमध्ये शिक्षक संघाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाला संबोधित करताना ठाकूर यांनी त्यांच्या मनातलं शल्य बोलून दाखवलं. ते म्हणाले, “मुस्लिम किंवा यादवांपैकी कोणी माझ्याकडे त्यांच काम घेऊन आलं तर मी त्यांना बसवेन, चहा-नाश्ता विचारेन, मात्र त्यांचं काम करणार नाही. त्यांनी माझ्याकडे यावं चहा-नाश्ता घ्यावा आणि परत जावं.”

देवेश चंद्र ठाकूर म्हणाले, “एनडीएच्या मतांचं विकेंद्रीकरण झालं. यामागची कोणतीही ठराविक कारणं नाहीत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कारणांमुळे एनडीएला फटका बसला. सुरी आणि कलवार समाजाची अर्धी मतं इंडियाला मिळाली. याचं नेमकं कारण काय? कुशवाहा समाजाची मतं देखील विभागली गेली. ही सगळी एनडीएची मतं होती. परंतु, आपण ही मतं का गमावली? कुशवाहा समाजातील लोक केवळ एकाच कारणामुळे खूश झाले होते की, लालू प्रसाद यादव यांनी या समाजातील सात उमेदवारांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं.”

हे ही वाचा >> “भाजपाच्या नवनिर्वाचित मंत्र्याचं मद्यप्राशन करून नृत्य”, काँग्रेसची VIDEO शेअर करत जोरदार टीका

खासदार ठाकूर म्हणाले, “कुशवाहा समाज इतका स्वार्थी झाला आहे की त्यांच्या समाजातून आलेले सम्राट चौधरी राज्याचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. तरी देखील त्यांनी एनडीएला मतं दिली नाहीत. उपेंद्र कुशवाहा जिंकले असते तर आज केंद्रात मंत्री झाले असते. कुशवाहा समाजातील कोणतेही पाच-सात खासदार झाले असते तर सीतामढीत काय फरक पडला असता? कुशवाहा समाज त्यांच्याकडे कामं घेऊन गेलाच असता ना. पण तसं झालं नाही. त्यांची विचारसरणी किती विकृत झाली आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jdu mp devesh chandra thakur says muslims yadav did not vote for me wont do their work asc