बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार २०२४ लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, जेडीयूचे प्रमुख स्वत: उत्तर प्रदेशातील फुलपूर येथून निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचीही चर्चा रंगली आहे. काही रिपोर्ट्सनुसार, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी नितीशकुमार यांना त्यांच्या निवडीनुसार कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढण्याची ऑफ दिली असून, आपल्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल असं आश्वासन दिलं आहे. दुसरीकडे, जनता दलाच्या काही कार्यकर्त्यांनी नितीशकुमार यांनी फुलपूर येथून निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे.
जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंग यांनीदेखील नितीशकुमार उत्तर प्रदेशातून लोकसभा निवडणूक लढवू शकतात असे संकेत दिले आहेत. नितीशकुमार यांना फक्त फुलपूरच नव्हे तर आंबेडकर नगर, मिर्झापूर येथूनही निवडणूक लढण्यासाठी ऑफर दिली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
“यामध्ये स्वीकारणं किंवा नकार देण्यासारखं काही नाही. नितीशकुमार लोकसभा निवडणूक लढणार की नाही याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. पण त्यांना आंबेडकर नगर आणि मिर्झापूर येथूनही निवडणूक लढण्याची ऑफर देण्यात आली आहे. ते विरोधकांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करत असल्यानेच समर्थकांना त्यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवावी असं वाटत आहे,” असं ललन सिंग म्हणाले आहेत.
लोकसभेच्या जास्त जागा असल्याने उत्तर प्रदेश निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचं राज्य असल्याचं ललन सिंग यांनी सांगितलं आहे. भाजपाकडे सध्या उत्तर प्रदेशातून ६५ खासदार आहेत, आणि जर अखिलेश यादव-नितीशकुमार एकत्र आले तर त्यांना १५ ते २० जागांपर्यंत रोखलं जाऊ शकतं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
…अन् मृत्यूशी झुंज संपली; कॅनडातील गोळीबारात जखमी झालेल्या भारतीय विद्यार्थ्यानं घेतला अखेरचा श्वास
“उत्तर प्रदेश महत्त्वाचं राज्य असून, येथे विरोधकांची एकजूट मोलाची आहे. तसं झाल्यास, भाजपाला १५ ते २० जागाच मिळतील” असं ललन सिंग म्हणाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदारसंघ असणाऱ्या वाराणसीपासून फुलपूर हे फक्त १०० किमी अंतरावर आहे. त्यामुळे जर नितीशकुमार यांनी २०२४ ला फुलपूरमधून निवडणूक लढवण्याचं ठरवल्यास राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जर २०२४ मध्ये नरेंद्र मोदींना आव्हान द्यायचं असेल तर उत्तर प्रदेशात मोठा विजय मिळवावा लागेल याची नितीशकुमार यांना कल्पना आहे.