इंडिया आघाडीच्या समन्वयात महत्त्वाची भूमिका निभावणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी संयुक्त जनता दल अर्थात जेडीयू या पक्षाच्या संघटनेत आता महत्त्वाचे बदल केले आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले असताना राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन सिंह ऊर्फ लल्लन सिंह यांना बाजूला सारून आता नितीश कुमार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत. आज दिल्ली येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत लल्लन सिंह यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि नव्या अध्यक्षांसाठी नितीश कुमार यांच्या नावाचा ठराव मांडला.
हे वाचा >> जदयू पक्षातील नेते नाराज? खुद्द नितीश कुमार यांनीच दिलं उत्तर, म्हणाले; “आमच्या…”
राजीनामा देण्याच्या आधी मुख्यमंत्री नितीश कुमार आणि लल्लन सिंह हे एकाच गाडीतून सभेच्या ठिकाणी आले. यावेळी जदयूच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. “नितीश कुमार जिंदाबाद, देश का प्रधानमंत्री कैसा हो, नितीश कुमार जैसा हो”, अशा प्रकारच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. द इंडियन एक्सप्रेसच्या बातमीनुसार, लल्लन सिंह राजीनामा देण्यासाठी तयार नव्हते. मला बाजूला केले तर इंडिया आघाडीत चुकीचा संदेश जाईल, अशी लल्लन सिंह यांची धारणा होती. मात्र पक्षातील इतर नेत्यांना नितीश कुमार हेच राष्ट्रीय अध्यक्ष व्हावेत असे वाटत असल्यामुळे त्यांना बाजूला व्हावे लागले.
बिहारचे मंत्री आणि जदयू नेते विजय कुमार चौधरी यांनी सांगितले की, नितीश कुमार यांनी अध्यक्षपद स्वीकारले आहे. थोड्या वेळातच राष्ट्रीय परिषदेची बैठक होईल, त्यात लल्लन सिंह यांनी मांडलेल्या ठरावाला अनुमोदन मिळाल्यानंतर अधिकृतरित्या याची घोषणा होईल. लल्लन सिंह यांनी मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सांगण्यावरूनच हे पद स्वीकारले होते. आता निवडणूक लढण्यासाठी आणि प्रचारासाठी त्यांना सतत दौर करावा लागणार आहे. यासाठी त्यांनी नितीश कुमार यांना हे पद स्वीकारण्याची विनंती केली.
लल्लन सिंह यांना हटविण्याचे कारण?
काही दिवसांपासून नितीश कुमार हे लल्लन सिंह यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर नाराज असल्याचे म्हटले जात आहे. तसेच त्यांची राष्ट्रीय जनता दलाशी जवळीक वाढली असल्यामुळे पक्ष नाराज आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या कार्यक्रमाच्या फलकांवर त्यांचा फोटोही छापण्यात येत नाही, अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसने दिली आहे.
नितीश कुमार हे पंतप्रधानपदासाठी उत्सुक असून, पक्षातील नेतेदेखील याबाबत उघडपणे बोलताना दिसतात. मात्र, पक्षातील नेते याबाबतची भूमिका इंडिया आघाडीसमोर योग्य रीतीने मांडू शकले नाहीत, आवश्यक ती चर्चा करू शकले नाहीत, असे नितीश कुमार यांचे मत आहे. याच कारणामुळे नितीश कुमार हे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याचा निर्णय घेत आहेत, असे म्हटले जात आहे.
आणखी वाचा >> Video: बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार? भाजपाच्या केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, “चक्रव्यूह रचलंय, आता…!”
शरद यादव यांनाही बाजूला सारले होते
एनडीएमध्ये असताना नितीश कुमार यांनी २०१६ सालीही असाच निर्णय घेतला होता. त्यावेळी नितीश कुमार यांच्यासाठी दिवंगत नेते शरद यादव यांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाची खुर्ची मोकळी केली होती.
दरम्यान, जदयू पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष लल्लन सिंह हे मुंगेर या लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. त्यांनी जुलै २०२१ मध्ये अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली होती. लल्लन सिंह यांच्याआधी आर. सी. पी. सिंह हे जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. आरसीपी यांची भाजपाशी जवळीक वाढत असल्यामुळे नितीश कुमार यांनी त्यांना अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर आता लल्लन सिंहही बाजूला सारले गेले आहेत.