Bihar Politics Nitish Kumar Updates : बिहारच्या राजकारणात नितीश कुमार यांनी पुन्हा एकदा वादळ निर्माण केले आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीनंतर ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. २०२० साली नितीश कुमार यांच्या जनता दल (युनायटेड) पक्षाने भाजपासह निवडणूक लढविली आणि निकालानंतर सत्ता स्थापन केली. मात्र २०२२ रोजी भाजपाशी अचानक काडीमोड घेत, विधानसभेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाशी हातमिळवणी केली. आता दोनच वर्षात आरजेडीला सोडून नितीश कुमार पुन्हा भाजपाबरोबर जात आहेत. या प्रकरणावर आता एमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी टीका केली असून नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारच्या जनतेची माफी मागावी, असे ओवेसी म्हणाले आहेत.
ही आहेत नितीश कुमार भाजपाबरोबर जाण्याची कारणे?
असदुद्दीन ओवेसी पुढे म्हणाले, “नितीश कुमार, तेजस्वी यादव आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या तिघांनीही बिहारच्या जनतेची फसवणूक केली आहे. विशेष करून नितेश कुमार यांनी मोठी फसवणूक केली. राजकीय संधीसाधूपणाही कमी पडेल, अशी कामगिरी नितीश कुमार यांनी यांनी केली आहे. मी आधीपासून सांगत आलो होतो की, नितीश कुमार हे भाजपाबरोबरच जातील.”
तेजस्वी यादव आता कसं वाटतंय?
“मला आता तेजस्वी यादव यांना प्रश्न विचारायचा आहे. आता कसं वाटतंय? तेजस्वी यादव यांनी आमचे चार आमदार फोडले. आता त्यांना आमचे दुःख कळाले असेल. आमच्याबरोबर त्यांनी जो खेळ केला, तोच आता त्यांच्याबरोबर झाला आहे. नितीश कुमार यांना लालूंच्या पक्षाने दोन-दोन वेळा मुख्यमंत्री बनविले, तरीही त्यांच्याशी दगा झाला. नितीश कुमार पुन्हा बिहारचे मुख्यमंत्री होणार असले तरी बिहारमध्ये राज्य भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेच असेल. आम्ही हे थांबविण्याचा प्रयत्न करत होतो”, अशी टीका ओवेसी यांनी केली.
“कचरा पुन्हा कचराकुंडीत…”, लालू प्रसाद यादव यांच्या मुलीची नितीश कुमारांवर टीका
ओवेसी पुढे म्हणाले की, तेजस्वी यादव आणि त्यांच्या कुटुंबातील लोकांना वाटतं की, त्यांच्या घरातील व्यक्ती मुख्यमंत्री बनावा. दुसरीकडे नितीश कुमार यांना वाटतं की, जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मीच बिहारचा मुख्यमंत्री राहावे आणि भाजपाला तर प्रत्येक गोष्ट हवी असते. नितीश कुमार यांनी महिलांच्या बाबतीत भर विधानसभेत अश्लाघ्य विधान केले होते. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाने त्यांच्यावर कठोर टीका केली. पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, ही घाण आम्ही स्वच्छ करू. पण आज तेच नितीश कुमार यांना बाजूला बसवून चहा पाजत आहेत. यामुळे बिहारच्या जनतेशी दगाफटका झाला असून राज्याचा विकास खुंटला आहे. आम्ही मात्र राज्याच्या विकासाची लढाई लढत राहू.
“सरडा उगाच बदनाम आहे”, तेजप्रताप यादवांचा नितीश कुमारांना टोला; म्हणाले, “या पलटिस कुमारला…”
भारतातील मुस्लीमांना फसविण्यासाठीच राजकीय पुरोगामीत्वाचा चेहरा पुढे केला जातो. यावेळी बिहारच्या मुस्लीमांना पुन्हा दगा दिला गेला आहे. मी अपेक्षा करतो की, देशभरातील सर्व मुस्लीम समाज, दलित, आदिवासी आणि वंचित घटकांनी याकडे लक्ष द्यावे. तुम्ही मत तर राजकीय पुरोगामी पक्षांना देता, पण तुमचे मत हे पक्ष भाजपाच्या पारड्यात नेऊन टाकतात, असा आरोपही ओवेसी यांनी केला.