लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार हे दोन नेते एकमेकांचे जवळचे मित्र मानले जातात. पण राजकारणात कोणीही कोणाचा मित्र आणि शत्रू फार काळ राहात नाही, या दोघांचे संबंध आता आणखी ताणले गेले आहेत, कारण राजदच्या पाटण्यात होणाऱ्या ‘बीजेपी हटाओ देशको बचाओ’ या रॅलीतून जदयूने अंग काढून घेतले आहे. टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, राजद आणि जदयू यांच्यात एक बैठक झाली, या बैठकीनंतर जदयूने या रॅलीत सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या दोघांचे संबंध आणखी बिघडले आहेत यात शंका नाही. शनिवारीच जदयूचे ज्येष्ठ नेते के.सी. त्यागी यांनी नितीशकुमारांची प्रतिमा काँग्रेसने बिघडवल्याचे म्हटले होते. त्यात आता जदयूने भाजपविरोधी रॅलीवर बहिष्कार घातला आहे.
लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल या पक्षाने २७ ऑगस्ट २०१७ रोजी बिहारमध्ये भाजपविरोधी रॅली आयोजित केली आहे. बीजेपी हटाओ देशको बचाओ असेच या रॅलीचे नाव आहे, या रॅलीला काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवैगौडा या सगळ्यांनी पाठिंबा दिला आहे. हे सगळे नेते या रॅलीत सहभागी होण्याचीही शक्यता आहे.
या सगळ्यांप्रमाणेच समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बसपाच्या मायावती यांनीही या रॅलीला पाठिंबा दिला आहे, हे दोघेही या रॅलीत सहभागी होण्याची चिन्हे आहेत. अशात या भाजपविरोधी रॅलीवर मात्र बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बहिष्कार घातला आहे. त्याचमुळे राजद आणि जदयू यांच्यातली घट्ट मैत्री आता कुठेतरी शत्रुत्त्वात बदलताना दिसते आहे.
गेल्या काही दिवसांपासूनच जदयू आणि राजद यांच्यातले मतभेद चव्हाट्यावर येताना देश पाहतोय. काँग्रेसने जेव्हा राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मीरा कुमार यांचे नाव जाहीर केले तेव्हा जदयूने NDA च्या रामनाथ कोविंद यांना पाठिंबा देऊन सगळ्यांनाच धक्का दिला. इतकेच नाही तर बिहारच्या कन्येला राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत हरवण्यासाठीच उभे केले आहेत ना? असा खोचक प्रश्नही नितीशकुमारांनी विचारला होता. ज्यामुळे काँग्रेस आणि राजदचा तिळपापड झाला.
असे असूनही लालूप्रसाद यादव यांनी नितीशकुमारांचे मन वळवण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि मीरा कुमार यांना पाठिंबा देण्याचे आवाहन केले, मात्र लालूप्रसाद यादव यांची शिष्टाई सपशेल फोल ठरली. आता भाजपविरोधी रॅलीवरही जदयूने बहिष्कार घातला आहे. त्यामुळे या दोघांमधून विस्तवही जात नसल्याचे स्पष्ट आहे. नितीशकुमारांचा आणि त्यांच्या पक्षाचा एनडीए आणि पर्यायाने भाजपकडे वाढता कल नव्या समीकरणांची नांदी तर ठरणार नाही ना? अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसते आहे.