काँग्रेससमवेत केवळ बिहारमध्ये आमची हातमिळवणी झाली आहे, असे स्पष्ट करून जद(यू)ने मंगळवारी दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीला (आप) पाठिंबा देण्याचे संकेत दिल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
दिल्ली विधानसभेत जद(यू)ने ‘आप’ला पाठिंबा जाहीर केल्याचा काँग्रेसने निषेध केला आहे याकडे लक्ष वेधले असता जद(यू)चे प्रदेशाध्यक्ष वसिष्ठ नारायण सिंह म्हणाले की, आम्ही काँग्रेसशी केवळ बिहारमध्ये हातमिळवणी केली आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीत जद(यू) अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील ‘आप’ला पािठबा देणार आहे, असेही प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
दरम्यान, दिल्लीत आपला पाठिंबा द्यावा असा प्रस्ताव आहे, मात्र त्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही, असे जद(यू)चे सरचिटणीस के. सी. त्यागी यांनी सांगितले. सपा आणि राजदने दिल्लीत उमेदवार जाहीर केले आहेत. अशा स्थितीत जद(यू)ने आपला पाठिंबा दिल्यास चांगली कामगिरी करता येणे शक्य नाही, त्यामुळे आम्ही याबाबतचा निर्णय प्रलंबित ठेवलेला आहे, असे त्यागी म्हणाले.
बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार हे अरविंद केजरीवाल यांचा प्रचार करीत असल्याबद्दल काँग्रेसचे नेते प्रेमचंद्र मिश्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
काँग्रेसने जद(यू)ला बिहारमध्ये पाठिंबा दिला आहे, याचे स्मरण मिश्रा यांनी करून दिले आहे. यापूर्वी नितीशकुमार यांनी ओमप्रकाश चौताला यांच्या आयएनएलडीला काँग्रेसविरोधात पाठिंबा दिला.
आता दिल्लीतही तीच भूमिका घेतल्यास काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज होतील, असे मिश्रा यांनी म्हटले आहे.
दिल्लीत आपला पाठिंबा देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला, तर बिहारमध्ये जद(यू)ला दिलेल्या पाठिंब्याचा फेरविचार काँग्रेस पक्षश्रेष्ठींना करावा लागेल, असेही मिश्रा यांनी म्हटले आहे.

Story img Loader