राष्ट्रीय लोकशाहीतून बाहेर पडत बिहारमध्ये स्वतंत्र संसार थाटणाऱ्या जनता दल युनायटेड पक्षाने संसदेमध्ये अन्न सुरक्षा विधेयकास पाठिंबा देणार असल्याचे म्हटले आहे. यामुळे युपीए सरकारला अन्न सुरक्षा विधेयक संमत करण्यासाठी पाठबळ मिळाले आहे.
 या विधेयकाचा लाभ बिहारमधील ८६ टक्के लोकांना होणार आहे, असे सांगत जदयुचे प्रवक्ते के.सी.त्यागी यांनी या विधेयकाला आपला पक्ष पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले. जदयुचे लोकसभेत २० तर राज्यसभेत ८ खासदार आहेत. आपल्या पक्षाने विधेयकास सुचविलेल्या दोन दुरुस्त्या काँग्रेसने मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता विरोध करावे, असे काही उरलेले नाही, असे त्यागी यांनी स्पष्ट केले.
समाजवादी पक्षाचाही अन्न सुरक्षा विधेयकास पाठिंबा
आम्ही सुचविलेल्या दुरुस्त्या मान्य करायची तयारी जर सरकार दाखवित असेल तर आमचा पक्ष अन्न सुरक्षा विधेयकास पाठिंबा देईल, असे समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी संसदेच्या आवारात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. तांदूळांबरोबरच पोषक आहार म्हणून डाळीही स्वस्त दरांत देण्याची तरतूद करावी अशी समाजवादी पक्षाची मागणी आहे. तसेच शेतकऱ्यांनाही शेतमालास योग्य भाव मिळावा यासाठी सपा आग्रही आहे.

Story img Loader