जनता दल यूनायटेड म्हणजेच जदयूच्या राष्ट्रीय परिषदेच्या बैठकीमध्ये राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी नितीश कुमार हे पंतप्रधान पदाचे दावेदार नसले तरी त्यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण असल्याचं म्हटलं आहे. राजीव रंजन यांच्या याच वक्तव्यामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळामध्ये सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या जदयू आणि भाजपा युतीमध्ये काहीतरी बिनसलं असल्याच्या चर्चा सुरु झाल्यात. ललन सिंह यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला असता त्यांना याचसंदर्भात अनेक प्रश्न विचारण्यात आले. याबैठकीनंतर मुख्यमंत्री नितीश कुमार पत्रकारांशी बोलत असताना समर्थकांकडून, ‘देश का पीएम कैसा हो नीतीश कुमार जैसा हो’ अशी घोषणाबाजीही झाली. दरम्यान नितशी हे सर्वगुण संपन्न असे पंतप्रधान पदाचे उमेदवार असल्याच्या या चर्चांमुळे भाजपा-जदयू युतीसंदर्भात चर्चांना उधाण आलाय.
नितीश कुमार यांच्यामध्ये पंतप्रधान पदाच्या उमेदवारामध्ये आवश्यक असणारे सर्व गुण आहेत. मात्र पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे गुण आणि पंतप्रधान पदासाठी दावा करणे या दोघांमध्ये फार अंतर आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या मनामध्ये काही संभ्रम असेल त्यांना मी हे सांगू इच्छितो की आमच्या नेत्यामध्ये पंतप्रधान बनण्यासाठी आवश्यक असणारे सर्व गुण आहेत, असं ललन सिंह म्हणाले. त्याचप्रमाणे एनडीएच्या विस्तारासंदर्भातही ललन सिंह यांनी भाजपाला इशारा दिलाय. भाजपा उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये जदयूला एनडीएमध्ये सहभागी करुन घेत नसेल तर आम्ही तिथे स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढवू. आम्ही यासाठी तयार करत असल्याचंही ललन सिंह म्हणाले आहेत.
राष्ट्रीय परिषदेची बैठक संपल्यानंतर जदयूचे राष्ट्रीय महासचिव के.सी. त्यागी यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती दिली. तसेच आम्ही एनडीए आणि भाजपासोबत एकजूटीने राहू असंही या बैठकीत ठरवण्यात आल्याचं त्यागी यांनी म्हटलं. त्यागी यांनी जातिनिहाय जनगणनेसंदर्भात पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ओबीसीच्या अंतर्गत काही जातीच्या लोकांना अधिक फायदा मिळत असल्याच्या चर्चा मागील बऱ्याच काळापासून सुरु आहेत. त्याच पार्श्वभूमीवर रोहिणी कमीशनचा अहवाल जाहीर करावा अशी आमची मागणी असल्याचं त्यागी म्हणाले.
नितीश कुमारही या बैठकीसाठी उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर ते बाहेर पडले तेव्हा पत्रकारांनी त्यांना पंतप्रधान मटेरियल असणाऱ्यासंदर्भात प्रश्न विचारले असता नितीश यांनी उत्तर देण्यास नकार दिला. मला अशाप्रकारच्या चर्चांमध्ये रस नाही. मी केवळ माझं काम करतो, असं नितीश म्हणाले. मात्र नितीश कुमार यांना विचारण्यात आलेला प्रश्न ऐकून तेथे उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी, ‘देश का पीएम कैसा हो नितीश कुमार जैसा हो.’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. ही घोषणाबाजी ऐकून नितीश कुमार थोडे गोंधळात पडले. मात्र त्यांचे समर्थक घोषणाबाजी करत राहिले. अखेर नितीश यांनी या घोषणाबाजीदरम्यानच तिथून काढता पाय घेतला. नितीश कुमार यांच्या नावाची थेट पंतप्रधान पदाचा उमेदावर या अनुषंगाने चर्चा सुरु झाल्याने बिहारमधील राजकीय वातावरण तापलं आहे. आता भाजापा यावर काय प्रतिक्रिया देतं किंवा एनडीएच्या मजबूतीसंदर्भात काही निर्णय घेतला जातो का हे आगामी काळामध्ये स्पष्ट होईल.