आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या ताफ्यामुळे वाहतूक कोंडी झाल्यामुळे सोमवारी सकाळी २० हून अधिक विद्यार्थ्यांना जेईईची परीक्षा देता आली नसल्याचा दावा विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे. विशाखापट्टणममध्ये हा प्रकार घडला आहे. परंतु, हा दावा शहर पोलिसांनी खोडून काढला आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं.

विशाखापट्टणमच्या पेंडुर्थी येथील अयान डिजिटल परीक्षा केंद्राजवळ ही घटना घडली. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचायला उशीर झाल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. त्यामुळे जवळपास २३ विद्यार्थ्यांचे पालक परीक्षा केंद्राबाहेर जमले होते. त्यांनी या घटनेवरून संताप व्यक्त केला. “आमची मुले अनेक महिन्यांपासून या परीक्षेची तयारी करत आहेत. पण त्यांची चुकी नसताना त्यांना परीक्षेस बसायला न लावणे हे वाईट आहे”, असे एका पालकाने सांगितले. उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यामुळे रस्ते बंद झाल्याचा दावा करणारे संदेश आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.परंतु, पालक आणि विद्यार्थ्यांचे हे आरोप विशाखापट्टणम शहर पोलिसांनी (VCP) फेटाळून लावले.

परीक्षा केंद्राचा गेट बंद झाल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांचा ताफा गेला

व्हीसीपीनुसार परीक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार विद्यार्थ्यांना सकाळी ७ वाजेपर्यंत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. सकाळी ८ वाजता गेट बंद करण्यात येणार होते. तर उपमुख्यमंत्र्यांचा ताफा सकाळी ८.४१ वाजता त्या भागातून गेला. म्हणजे गेट बंद झाल्यानंतर हा ताफा गेला. त्यामुळे, उपमुख्यमंत्र्यांच्या त्या भागातून जाण्याचा विद्यार्थ्यांच्या उशिरा येण्याशी कोणताही संबंध असू शकत नाही”, असं त्यांनी निवेदनात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

तसंच, परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीच्या आकडेवारीकडेही प्रशासनाने लक्ष वेधलं. ते म्हणाले, गेल्या काही दिवसापांसून विद्यार्थी अनुपस्थितीत राहत आहेत. मात्र, सोमवारी झालेल्या परीक्षेत गैरहजर राहणाऱ्यांची संख्या इतर दिवसांपेक्षा कमी होत. तसंच, व्हीसीपीने असे म्हटले की सकाळी ८.३० वाजेपूर्वी बीआरटीएस रस्त्यावर किंवा लगतच्या सर्व्हिस रोडवर कोणतीही वाहतूक रोखली गेली नव्हती. उपमुख्यमंत्री कार्यालयाने (DyCMO) स्वतःच्या निवेदनाद्वारे या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून प्रतिसाद दिला. पवन कल्याण यांनी या घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

“उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या दौऱ्यांदरम्यान लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत असे स्पष्ट निर्देश दिले आहेत”, असे उपमुख्यमंत्र्यांच्या निवेदनात म्हटलं आहे. “आम्ही अधिकाऱ्यांना वाहतुकीतील अडथळे कमीत कमी करण्याचे सातत्याने सांगितले आहे आणि या भेटीदरम्यानही तोच नियम पाळण्यात आला.”

उपमुख्यमंत्री कार्यालयाने विशाखापट्टणम पोलिसांना या ताफ्याने किती वेळ वाहतूक विस्कळीत केली, विद्यार्थ्यांच्या मार्गांवर वाहतूक परिस्थिती कशी होती आणि परीक्षा केंद्रावर जाण्यावर कोणत्याही वाहतूक नियंत्रण उपायांचा परिणाम झाला का, याची चौकशी करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह आघाडी सरकारच्या नेत्यांनी सायरनचा वापर मर्यादित करण्यास आणि त्यांच्या हालचालींमुळे जनतेला त्रास होणार नाही याची खात्री करण्यास सहमती दर्शविली आहे, यावरही निवेदनात भर देण्यात आला आहे.