Jeet Adani Diva Shah Marriage : अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचा धाकटा मुलगा जीत अदाणी आणि दिवा शाह यांचा लवकरच विवाह होणार आहे. दोघेही ७ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. अशात वैवाहिक जीवन सुरू करण्यापूर्वी जीत अदाणी आणि दिवा शाह यांनी बुधवारी मंगल सेवा केली. जीत अदानी यांनी अहमदाबाद येथील त्यांच्या घरी २१ नवविवाहित दिव्यांग महिला आणि त्यांच्या पतींची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत केली. याचबरोब जीत आणि दिवा दरवर्षी ५०० दिव्यांग तरुणींच्या विवाहाचा खर्च करणार आहेत. यासाठी ते प्रत्येक दिव्यांग तरुणीला १० लाख रुपये देणार आहेत. याची माहिती गौतम अदाणी यांनी एक्सवर पोस्ट करत दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वडील म्हणून माझ्यासाठी…

गौतम अदाणी यांनी एकवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले की, “माझा मुलगा जीत आणि सून दिवा एका पवित्र संकल्पाने त्यांचे वैवाहिक जीवन सुरू करत आहेत, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. जीत आणि दिवा दरवर्षी ५०० दिव्यांग बहिणींच्या विवाहाची जबाबदारी उचलणार आहेत. यासाठी प्रत्येक बहिणीला ते १० लाख रुपयांची आर्थिक मदत देत ‘मंगल सेवा’ करणार आहेत. वडील म्हणून, ही ‘मंगल सेवा’ माझ्यासाठी खूप समाधानाची आणि सौभाग्याची गोष्ट आहे.”

गौतम अदाणी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, “जीत आणि दिवा यांना सेवेच्या या मार्गावर पुढे जाण्यासाठी आशीर्वाद आणि शक्ती मिळावी अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना आहे.”

जीत अदाणी यांच्याबद्दल

जीत अदाणी सध्या अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्जचे संचालक आहेत, ही भारतातील सर्वात मोठी विमानतळ पायाभूत सुविधा कंपनी आहे. जी देशातील ८ विमानतळांचे व्यवस्थापन करते. याशिवाय ते अदाणी ग्रुपच्या संरक्षण, पेट्रोकेमिकल्स आणि तांबे व्यवसायाची जबाबदारी देखील सांभाळत आहेत.

कोण आहे दिवा शाह?

दिवा शाह हिरे व्यापारी जैमिन शाह यांची मुलगी आहे. त्या सी. दिनेश अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडच्या सह-मालकीण देखील आहेत. या प्रसिद्ध हिरे उत्पादन कंपनीचा मुंबई आणि सुरतमध्ये व्यवसाय आहे. दिनेश शाह आणि चिनू दोशी यांनी १९७६ मध्ये ही कंपनी स्थापन केली होती.

जीत आणि दिवा यांचा १४ मार्च २०२३ रोजी जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला होता. आता ते ७ फेब्रुवारी रोजी लग्न करणार आहेत. या लग्नाचे प्रमुख आकर्षण म्हणजे सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी जीत आणि दिवासाठी कस्टम शाल तयार करण्यासाठी फॅमिली ऑफ डिसेबल्ड या समाजसेवी संस्थेशी भागीदारी केली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jeet adani diva jaimin shah marriage pledges rs 10 lakh for 500 divyang brides every year aam