हॉलीवूड नायिका, गायिका आणि या सर्वाहून अधिक ‘पोस्टरी’ मदनिका म्हणून प्रसिद्ध असलेली जेनिफर लोपेझ ऊर्फ जेलो हिचे इंडियन प्रीमियर लीगच्या उद्घाटन सोहळ्यातील प्रस्तावित ‘चमको नृत्य’ तिच्यासाठी स्वप्नच ठरणार आहे. आपल्यासोबत असलेल्या भरगच्च लवाजम्याचा खर्चही आयपीएलने करण्याच्या अवाजवी मागण्यांमुळे या ललनेच्या आकर्षक नृत्यावर आयपीएलने काट मारली आहे.
मागण्या काय?
४३ वर्षीय जेनिफर लोपेझ आपल्या गाण्यांमुळे व ब्लॉकबस्टरी हॉलीवूड चित्रपटांमुळे २००० ते २००५ या काळामध्ये सर्वाधिक चर्चित आणि लोकप्रिय असामी बनली. फॅशन जगतामध्येही उडी मारून तिने आपल्या कर्तृत्वाला लख्ख झळाळी आणून दिली.  
आपल्या या स्टारपदाला जागणाऱ्या अशा उच्च कोटीच्या मागण्या तिने आयपीएल उद्घाटन समारंभात सहभागी होण्यासाठी केल्या. त्यात स्वतंत्र विमान, डझनांहून अधिक हॉटेल रूम्स, आपल्यासोबत कलाकारांचा प्रचंड मोठा ताफा, स्टायलिस्ट, साहाय्यक आणि आचारी आदींचाही खर्च आयपीएलने करावा, असे जेनिफर लोपेझने म्हटल्याचे ‘सन’ वृत्तपत्राने म्हटले आहे.
झाले काय?
आयपीएलची प्रसिद्धी आणि जगभरातील प्रेक्षकवर्गाची संख्या पाहता जेनिफर लोपेझने या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन स्वत:ला अधिक लोकप्रियता मिळवून द्यायला हवी होती, मात्र तिच्या मागण्या अवास्तव आणि मूर्खपणाच्या असल्याने तिचा कार्यक्रमच रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जेनिफर लोपेझऐवजी कार्यक्रमाचे नियोजक आता रॅप संगीतातील स्टार पिटबॉल यांना पाचारण करणार असल्याची चर्चा आहे. २ एप्रिल रोजी कोलकाता येथे होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये बॉलीवूडचे आघाडीचे कलाकार शाहरूख खान आणि कतरिना कैफ यांचा कार्यक्रम होईल.
याबाबत जेनिफर लोपेझ हिच्या प्रवक्त्यांशी चर्चा केली असता, तिनेच गाण्यांच्या ध्वनिमुद्रणामुळे या कार्यक्रमामध्ये येण्याचे नाकारल्याचे ‘सन’ला म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा