जेट इंधन किंवा विमानाच्या इंधनाची किंमत मंगळवारी ४ टक्क्यांनी उणावली आह़े त्यामुळे विमान प्रवास स्वस्त होण्याची शक्यता आह़े तसेच सवलतीचे वार्षिक १२ गॅस सिलिंडर वापरल्यानंतरच्या विनाअनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची किंमतही १०० रुपयांनी कमी झाली आह़े जागतिक बाजारातील उलाढालींचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आह़े
दरकपातीनंतर दिल्लीतील विमान इंधनाची किंमत ३०२५.३४ रुपये प्रति किलोलिटरने कमी होऊन ७१ हजार ८००.२१ झाली आहे, अशी माहिती इंडियन ऑइल या देशातील सर्वात मोठय़ा इंधन विक्रेत्या कंपनीने दिली़ विशेष म्हणजे गेल्याच महिन्यात या इंधनाचे दर प्रति किलोलिटर ७५३.३४ ने वाढले होत़े त्यानंतर लगेचच ही दरकपात झाल्याने हवाई वाहतूक क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आह़े मुंबईतही विमान इंधनाचे दर ७७ हजार ३२२.६ रुपये प्रति किलोलिटरवरून ७४ हजार १०५.१६ रुपये प्रति किलोलिटर झाले आहेत, असे इंडियन ऑइलकडून सांगण्यात आल़े
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची घसरलेली किंमत आणि डॉलरच्या तुलनेत सावरलेला रुपया यामुळे तेल आयात स्वस्त झाली आह़े दोन दिवसांपूर्वी पेट्रोलच्या किमतीतही घट झाली होती़ त्यानंतर आता विमान इंधनही स्वस्त झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आल़े
विमान कंपन्यांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कापैकी ४० टक्के रक्कम इंधनावर खर्चाची असत़े त्यामुळे इंधन दरात झालेल्या कपातीमुळे हवाई वाहतूकही स्वस्त होण्याची शक्यता आह़े मात्र या दरकपातीचा प्रवासी वाहतुकीवर काय परिणाम होईल, यावर अद्याप कोणत्याही विमान कंपनीने भाष्य केलेले नाही़
तसेच वर्षभरात १२ अनुदानित गॅस सिलिंडरनंतरच्या विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किमतीत १०० रुपयांची घट करण्यात आली आह़े फेब्रुवारी महिन्यापासूनची ही तिसरी कपात आह़े नव्या दरांनुसार आता १४.२ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत दिल्लीत १ हजार ८०.५० वरून ९८०.५० रुपये झाली आह़े १ फेब्रुवारी रोजी या सिलिंडरच्या किमतीत १०७ रुपयांची आणि त्यानंतर मार्चमध्ये ५३.५ रुपयांची कपात करण्यात आली होती़
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा