विमानासाठी लागणाऱ्या इंधनाच्या दरामध्ये ९.२ टक्क्यांनी आणि विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात २१ रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय बुधवारी घेण्यात आला. जागतिक बाजारातील घडामोडींमुळे इंधनाच्या दरात सलग चौथ्या महिन्यात वाढ झाली आहे.
विमानांसाठी लागणाऱ्या जेट फ्युएलमध्ये प्रति किलोलीटरमागे ३९४५.४७ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जेट फ्युएलचा प्रति किलोलीटरचा दर वाढीनंतर ४६,७२९.३८ रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे, असे भारतीय तेल कंपन्यांकडून बुधवारी जाहीर करण्यात आले. या वाढीमुळे विमान प्रवासाचे भाडे वाढण्याची शक्यता आहे. सध्यातरी याबाबत विमान वाहतूक कंपन्यांकडून काहीही माहिती मिळालेली नाही.
विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या दरामध्येही २१ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये विनाअनुदानित गॅस सिलिंडरचा दर सध्या ५२७.५० प्रति सिलिंडर इतका होता. तो आता वाढून ५४८.५० रुपये प्रति सिलिंडर झाला आहे. दिल्लीमध्ये सध्या अनुदानित गॅस सिलिंडरचा दर ४१९.१८ रुपये इतका आहे.

Story img Loader