पक्षातून निलंबित केलेले खासदार राम जेठमलानी यांनी मंगळवारी संसदीय पक्षाच्या बैठकीत ‘घुसखोरी’ केली तसेच भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर सरकारविरोधात मवाळ भूमिका घेत असल्याची टीका केली. जेठमलानी यांच्या या घुसखोरीमुळे भाजप नेत्यांमध्ये नाराजी पसरली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. जेठमलानी यांनीही निलंबनाच्या नोटीशीला विरोध केला असून त्यापेक्षा मला पक्षातून काढून टाका, अशी मागणी केली आहे.
जेठमलानी यांना संसदीय पक्षाच्या साप्ताहिक बैठकीत हजर राहण्याची परवानगी नाही. मात्र तरी मंगळवारी ते संसद भवनाच्या आवारातील भाजपच्या या बैठकीत घुसले आणि पक्ष भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर खूपच मवाळ भूमिका घेत असल्याची टीका केली. जेठमलानी तावातावाने असे बोलत असताना  पक्षाचे वरिष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेठली आदी नेतेमंडळी अगदी शांत होती. रविशंकर प्रसाद, शहानवाझ हुसैन आदी नेत्यांनी मात्र जेठमलानी यांच्या वागणुकीबद्दल तीव्र आक्षेप घेत त्यांच्या हकालपट्टीची मागणी केली. याआधी काही मुद्दय़ांवर पक्षावर टीका केल्यामुळे गेल्या वर्षी २५ नोव्हेंबर रोजी त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले होते.

Story img Loader