नासाची २०२० मधील मोहीम, मातीचे नमुने गोळा करणार

नासाने २०२० मध्ये मंगळावर रोव्हर गाडी उतरवण्याचे ठरवले असून त्यासाठी ३.६ अब्ज वर्षांपूर्वीच्या जुन्या विवराची जागा निश्चित करण्यात आली आहे. सोमवारी याबाबतची घोषण करण्यात आली असून जेथे ही रोव्हर गाडी उतरवली जाणार आहे, त्या विवराचे नाव जेझिरो असे आहे. पाच वर्षे शोध घेतल्यानंतर मंगळावरील साठ ठिकाणांतून या विवराची निवड रोव्हर गाडी उतरवण्यासाठी करण्यात आली. जुलै २०२० मध्ये ही रोव्हर गाडी मंगळावर पाठवली जाणार असून त्यासाठी ठिकाण निवडण्यासाठी मंगळ मोहिमेतील चमूने चर्चा केली. मंगळावर पूर्वी असलेल्या जीवसृष्टीचे पुरावे गोळा करणे हा या मोहिमेचा उद्देश असून तेथे सूक्ष्मजीवांचे अस्तित्व शोधण्यासाठी मातीचे नमुने गोळा करण्यात येणार आहेत. नासा व युरोपीयन स्पेस एजन्सी यांनी मंगळावरील मातीचे नमुने गोळा करून ते पृथ्वीवर आणण्याचे निश्चित केले असून त्यासाठी ठिकाण निश्चित केले आहे. नासाचे मोहीम संचालक थॉमस झुरबुशेन यांनी सांगितले, की जेझिरो विवर हे भूगर्भशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्त्वाचे असून ते ३.६ अब्ज वर्षांपूर्वीचे असल्याने त्याच्या संशोधनातून ग्रहांची निर्मिती व खगोलजीवशास्त्रातील काही बाबींवर प्रकाश पडणार आहे. एका विशिष्ट ठिकाणचे नमुने गोळा करण्याने मंगळाबाबत विचारात क्रांतिकारक बदल होणार आहे. जेझिरो विवर हे मंगळाच्या विषुववृत्ताच्या उत्तरेकडे इसिडीस प्लॅनिशिया या पठाराच्या पश्चिम कडेला आहे. इसिडिस भाग हा जुना व मंगळाबाबत महत्त्वाची माहिती देऊ शकणारा आहे.

जेझिरो विवर

जेझिरो विवर हे ४५ किलोमीटरचे असून तेथून जुने सेंद्रिय रेणू मिळू शकतात. एके काळी येथे नदी होती. तेथे पाण्याचे पूर्वी अस्तित्व असल्याने सूक्ष्मजीव असू शकतात. याशिवाय तेथे पाच प्रकारचे खडक असून माती व काबरेनेटचा साठा आहे.