मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्य़ात पेटलवाड येथे इमारतीत झालेल्या स्फोटानंतर तिथे स्फोटके ठेवणाऱया व्यक्तीचा शोध घेण्यास पोलीसांनी सुरुवात केली आहे. या स्फोटामध्ये ८९ ठार तर १०० जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलीसांनी राजेंद्र कसावा यांच्याविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, असे पेटलवाडचे उपविभागीय पोलीस अधिकारी ए. आर. खान यांनी सांगितले. त्याला अटक करण्यासाठी मध्य प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी छापेही टाकण्यात आले आहेत. स्फोटानंतर लगेचच कसावा आणि त्याचे कुटुंबीय घरातून पळून गेले. कसावा यांच्या घराला पोलीसांनी सील केले आहे.
पोलिसांनी सांगितले की, हॉटेल असलेल्या तीन मजली इमारतीत स्वयंपाकाच्या गॅसचे सिलिंडर होते, त्याच्या शेजारी स्फोटकांचा साठा असलेली इमारत होती, त्यामुळे हा स्फोट झाला. दोन्ही इमारतींचे यात मोठे नुकसान झाले असून मोठय़ा भागात त्याचा परिणाम झाला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी अरूण शर्मा यांनी सांगितले की, ८२ मृतदेह सापडले असून त्यातील साठ मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेबाबत शोक व्यक्त केला असून, जखमींना लवकर बरे वाटावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. मध्य प्रदेश सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे असे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा