गिरिडीह : ‘सोनिया गांधी यांनी त्यांच्या मुलाला २० वेळा ‘लाँच’ करण्याचा प्रयत्न केला. परंतु झारखंडमध्ये २१ व्या प्रयत्नात त्यांचे ‘राहुल विमान’ कोसळणार, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी केली. झारखंडच्या गिरिडीह येथील प्रचार सभेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. कर्नाटकातील वक्फ बोर्डाने प्राचीन मंदिरांच्या जमिनी बळकावल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तीव्र विरोध असतानाही हे प्रकार थांबवण्यासाठी कायद्यात दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासनही शहा यांनी यावेळी दिले.
हेही वाचा >>> “घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलिंडर देणार”, काँग्रेस नेत्याची घोषणा; भाजपाकडून सडकून टीका
झारखंडमध्ये सत्ताधारी ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील सरकारने घुसखोरांना त्यांच्या मतपेढीत रुपांतर केले आहे. राज्यात भाजपची सत्ता आल्यावर अवैध स्थलांतर रोखले जाईल. आम्ही झारखंडमधून नक्षलवाद आणि प्रत्येक घुसखोराला हद्दपार करू, असे आश्वासन शहा यांनी दिले. ‘जेएमएम’च्या नेतृत्वाखालील आघाडीला मतदानाच्या पहिल्या टप्प्यातच बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. निकाल स्पष्ट असून, झारखंडमध्ये भाजप सरकार स्थापन करणार असल्याचा दावाही शहा यांनी केला.
हेमंत-बाबू आणि राहुल गांधी वक्फ दुरुस्ती विधेयकाला विरोध करीत आहेत. त्यांना विरोध करू द्या, भाजप वक्फ बोर्ड कायद्यात दुरुस्तीसाठी विधेयक मांडेल आणि तेव्हा कोणीही अडवू शकत नाही, असा इशाराही शहा यांनी दिला.