पीटीआय, नवी दिल्ली
झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील काँग्रेस आणि राजद यांच्याबरोबरची आघाडी मजबूत असून सरकारला कोणताही धोका नाही असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री चम्पाई सोरेन यांनी रविवारी व्यक्त केला. झारखंडमधील काही आमदार मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असल्याच्या चर्चेवर सोरेन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
सोरेन यांनी रविवारी नवी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. झारखंडमधील काँग्रेसचे आमदार मंत्रिपदावरून नाराज असल्याची चर्चा आहे. त्याबद्दल विचारले असता ‘‘हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे, ते तो सोडवतील’’, असे उत्तर त्यांनी दिले. झामुमो आणि काँग्रेसदरम्यान कोणताही संघर्ष नसून सर्व काही ठीक आहे असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा >>>मोठी बातमी! कांदा निर्यातीवरील बंदी हटवली; राज्यमंत्री भारती पवार यांची माहिती
झारखंड विधानसभेचे अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. त्यावर बहिष्कार घालून जयपूरला जाण्याचा इशारा काँग्रेसच्या १२ आमदारांनी दिला आहे. झामुमो, काँग्रेस आणि राजद आघाडीचे एकूण ४७ आमदार आहेत. त्यापैकी काँग्रेसचे एकूण १७ आमदार असून त्यापैरी १२ जण नाराज असल्याच्या वृत्तांमुळे राज्यातील आघाडी सरकारला धोका निर्माण झाला असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
काँग्रेसमध्ये नाराजी का?
शुक्रवारी सोरेन मंत्रिमंडळात आठ मंत्र्यांचा शपथविधी झाला. मंत्रिमंडळात काँग्रेसच्या आलमगीर आलम, रामेश्वर ओरान, बन्ना गुप्ता आणि बादल पत्रलेख अशा एकूण चार जणांचा समावेश आहे. त्यावरून अन्य १२ आमदार नाराज झाले आणि ते शनिवारी संध्याकाळी दिल्लीला रवाना झाले. नाराजी दूर न झाल्यास दिल्लीहून रांचीला न जाता भाजपची सत्ता असलेल्या राजस्थानची राजधानी जयपूरला जाण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.