जगभरात करोनाचा प्रसार वाढू लागल्यापासून सर्वाधिक आग्रह सरकारकडून किंवा प्रशासकीय यंत्रणेकडून कुठला करण्यात येत असेल तर तो म्हणजे मास्क वापरणे, हात वेळोवेळी धुणे आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणे. करोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये देखील सातत्याने मास्क वापरण्याचा आग्रह सर्वच तज्ज्ञांकडून करण्यात येत असताना झारखंडच्या काँग्रेस आमदारांचं मात्र वेगळंच गणित आहे. त्यांच्यामते मास्क वापरणं आरोग्यासाठी त्रासदायक असून मास्कचा जास्त वापर करू नये! शिवाय, करोना चाचणीचाही काही उपयोग नसल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. त्यांच्या या विधानावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नेमकं काय म्हणाले आमदार महोदय?
झारखंडचे काँग्रेस आमदार इरफान अन्सारी यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना मास्क, करोना चाचणी आणि तिसऱ्या लाटेविषयी अजब तर्कट मांडलं. “माझ्याकडे मास्क आहे. पण आपण जास्त वेळ मास्क घालता कामा नये. मी एक आमदार म्हणून नाही, तर एमबीबीएस डॉक्टर म्हणून सांगतोय. जास्त वेळ मास्क नका लावू. गर्दीच्या ठिकाणी फक्त मास्क घाला. तुम्ही श्वास घेत आहात, कार्बन डाय ऑक्साईड सोडताय, पुन्हा तोच नाकावाटे आत घेताय.. काय चाललंय हे?”, असा प्रश्नच आमदार महोदयांनी उपस्थित केला आहे.
तिसरी लाट, टेन्शन नॉट!
दरम्यान, करोनाच्या तिसऱ्या लाटेचंही फार टेन्शन न घेण्याचा सल्ला आमदार इरफान अन्सारी यांनी दिला आहे. “करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे फार घाबरून जायचं कारण नाही. मी वारंवार सांगतो आहे. आम्ही देखील बघतोय. आमचे कुटुंबीय देखील आजारी होते. आज तुम्ही चाचणी करा, पॉझिटिव्ह येईल. परत करा, निगेटिव्ह येईल. त्याची काय किंमत आहे?” असाही सवाल अन्सारी यांनी केला आहे.
करोनावर उपचार कसा कराल? अन्सारी म्हणतात..
“जर तुम्ही आरटीपीसीआर करताय, त्याचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला, तर ते इन्फेक्शन दोन-तीन दिवसांत संपून जाईल. पॅरासिटॅमॉल खा, अँटिबायोटिक खा”, असा अजब सल्ला अन्सारी यांनी दिला आहे. एकीकडे फक्त भारतच नसून जगभरातले तज्ज्ञ करोनाविषयी सतर्क करत असताना, मास्क-चाचण्यांविषयी आग्रह धरत असताना आणि आजपर्यंत लाखो लोकांचे करोनामुळे मृत्यू झालेले असताना दुसरीकडे इरफान अन्सारी मात्र मास्क, करोना चाचणी आणि तिसऱ्या लाटेविषयी अजब दावा करत आहेत.