Jharkhand Election 2024 : महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. दोन्ही राज्याच्या निवडणुकीकडे अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे. या निवडणुकीसाठी दिल्लीतील दिग्गज नेत्यांच्या सभांचा धडाका सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. या सभांच्या माध्यमातून नेत्यांकडून जनतेला मोठी आश्वासनं देण्यात येत आहेत. तसेच सत्ताधारी आणि विरोधकांमध्येही आरोप-प्रत्यारोप सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. झारखंडमध्ये देखील विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरु आहे. यातच झारखंडमध्ये एक राजकीय वाद चव्हाट्यावर आला आहे.
रांची पोलिसांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. एवढंच नाही तर रांची पोलिसांनी संबंधित पोस्ट काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया एक्सला (ट्विटर) पत्र देखील लिहिलं असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. काँग्रेसच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करत कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेनं दिलं आहे.
हेही वाचा : Video : वडेट्टीवार कन्येची शिव्यांची लाखोली, मोबाईल टॉर्चमधल्या सभेत नेमकं काय घडलं? वाचा…
ऐन निवडणुकीत काँग्रेसने भारतीय जनता पक्षावर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खोटे आणि दिशाभूल करणारे व्हिडीओ पोस्ट केल्याचा आरोप केला आहे. भाजपाच्या झारखंड युनिटच्या अधिकृत एक्स या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. मात्र, हा व्हिडीओ निवडणुकीच्या आचारसंहिता आणि इतर निवडणूक कायद्यांच उल्लंघन असल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्यानंतर काँग्रेसने रविवारी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. यानंतर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत भाजपाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी भाजपाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
भारतीय जनता पक्षावर काँग्रेसने केलेल्या आरोपानंतर झारखंडमध्ये चांगलंच राजकारण तापलं आहे. यावरून दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत, तर भारतीय जनता पक्षाकडून यासंदर्भात स्पष्टीकरण देत काँग्रेसकडून करण्यात आलेले आरोप फेटाळण्यात आले आहेत. दरम्यान, झारखंडमध्ये १३ आणि २० नोव्हेंबर अशा दोन टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तसेच २३ नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे झारखंडमध्ये कोणत्या पक्षाचे सरकार येणार? झारखंडची जनता कोणाला कौल देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.