झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा हे कोळसा घोटाळा प्रकरणी दोषी ठरल्याचा निकाल दिल्लीतील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. यूपीएच्या काळात हा कोळसा घोटाळा चांगलाच गाजला. या घोटाळ्यासंबंधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्यावरही आरोप झाले. मात्र मधू कोडा यांना या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले. त्यांच्यासह इतर चारजणांनाही दोषी ठरवण्यात आले. याआधीही निवडणूक आयोगाने मधू कोडा यांना दणका देत निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब न दिल्याप्रकरणी कडक कारवाई केली होती. ३ वर्षे मधू कोडा निवडणूक लढवू शकणार नाहीत असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
Coal scam: Delhi’s Special CBI court holds former Jharkhand CM Madhu Koda, former Coal Secy HC Gupta, former Jharkhand Chief Secy Ashok Kumar Basu & one other as guilty of criminal conspiracy & section 120 B. Sentencing to take place tomorrow.
— ANI (@ANI) December 13, 2017
मधू कोडा हे २००६ मध्ये झारखंडचे मुख्यमंत्री होते. त्यावेळी ते अपक्ष आमदार होते. कोडा यांच्या राजकीय कारकिर्दिची सुरुवात ‘ऑल झारखंड स्टुडंट युनियन’च्या कार्यकर्ते म्हणून झाली होती. मधू कोडा यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघातही सक्रिय होते. बाबूलाल मरांडी यांच्या सरकारमध्ये त्यांनी पंचायत राज मंत्रिपद सांभाळले. २००५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं त्यांना तिकीट दिले नव्हते. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढली होती आणि जिंकलेही होते. या निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने त्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील अर्जुन मुंडा सरकारला समर्थन दिले होते. आता सीबीआयच्या विशेष न्यायालयाने कोडा यांचे हात कोळसा घोटाळ्यात रंगले असल्याचे म्हणत त्यांना दोषी ठरवले आहे. त्यांना नेमकी काय शिक्षा सुनावली जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
झारखंडमधील कोळसा खाण वाटपात कोलकात्यातील ‘विनी आयर्न आणि स्टील कंपनी’ला नियमबाह्य पद्धतीने खाण वाटप केल्याचे कोडा आणि इतर सनदी अधिकाऱ्यांवरील आरोप सिद्ध झाले आहेत. या कंपनीला झारखंडमधील राजहरा इथल्या कोळसा खाणी देण्यात आल्या होत्या. मधू कोडा यांना गुरुवारी म्हणजेच उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे.