झारखंडचे माजी आरोग्य आणि मजूरमंत्री भानुप्रताप शाही यांच्या सुमारे आठ कोटी रुपयांच्या मालमत्तेवर सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी टाच आणली. ‘मनी लॅण्डरिंग’ कायद्यान्वये ही कारवाई करण्यात आली.
गुरगावमधील अत्यंत गर्भश्रीमंत अशा परिसरातील पाच व्यापारी तसेच निवासी मालमत्ता, रांचीमधील मोक्याच्या वस्तीतील १० एकर जमीन, गढवा जिल्ह्य़ातील १० एकर जमीन यासह शाही यांच्या अनेक मालमत्ता जप्त करण्यात आल्या. त्यामध्ये नवी दिल्लीतील बँक खात्यांचाही समावेश असल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शाही हे सन २००५ मध्ये आमदार झाल्यानंतर त्यांच्या ज्ञात उत्पन्नापेक्षा सदर मालमत्ता कितीतरी अधिक आहे. शाही हे मंत्रिपदी असताना त्यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग केल्याचा सकृद्दर्शी पुरावा असून या प्रकरणी त्यांना कोणत्याही न्यायालयासमोर खेचण्याइतपत संचालनालयाकडे पुरावा आहे, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
सन २००५ ते २००९ या चार वर्षांच्या कालावधीत शाही यांनी मालमत्ता जमा केली. शाही यांची याआधीही सक्तवसुली संचालनालयाने डिसेंबर २०१३ मध्ये मालमत्ता जप्त केली होती. मंगळवारी जप्त करण्यात आलेल्या सर्व मालमत्ता सक्तवसुली संचालनालय ताब्यात घेणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा