दोन वर्षांपासून शाहनवाझचे एका तरुणीशी प्रेमसंबंध होते… यातून ती तरुणी गर्भवती झाली, पण गर्भवती होताच शाहनवाझने लग्नास नकार दिला. शेवटी हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनीही शाहनवाझसमोर दोन पर्याय ठेवले. तरुणीला बलात्काराची तक्रार दाखल करण्याचा अधिकार असून गुन्हा दाखल झाल्यास तुला तुरुंगाची हवा खावी लागेल किंवा त्या मुलीशी लग्न करुन प्रकरण मिटव. शेवटी आपली चूक लक्षात येताच शाहनवाझने पोलीस ठाण्यातच त्या तरुणीशी लग्न केले आणि पोलिसांनी दोघांना ‘नांदा सौख्य भरे’ असा आशिर्वाद दिला.

झारखंडमधील जमशेदपूरजवळील गावात शाहनवाझ (वय २७) हा तरुण राहतो. त्याचे गावातील एका तरुणीशी दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. यादरम्यान दोघांमधील जवळीक वाढली आणि ती तरुणी गर्भवती झाली. तिने शाहनवाझला गर्भवती असल्याचे सांगताच शाहनवाझने लग्नास नकार दिला. तिच्या आईवडिलांनी शाहनवाझच्या आईवडिलांची भेट लग्नाबाबत चर्चा केली. मात्र, शाहनवाझच्या कुटुंबीयांनी यास नकार दिला.

अखेर तरुणीचे आईवडिल तिला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचले. शाहनवाझविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी ते गेले होते. पोलिसांनी तरुणीची बाजू ऐकून घेतल्यानंतर शाहनवाझ आणि त्याच्या कुटुंबीयांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. तरुणीने बलात्काराची तक्रार दाखल केल्यास काय परिणाम होतील, याची माहिती शाहनवाझ आणि त्याच्या कुटुंबीयांना करुन देण्यात आली. शेवटी शाहनवाझ या लग्नासा़ठी तयार झाला आणि पोलिसांच्या साक्षीने त्या दोघांनी लग्न देखील केले.

Story img Loader