Jharkhand live in partner killing: काही वर्षांपूर्वी दिल्लीत लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या श्रद्धा वालकरची तिच्याच जोडीदाराने निर्घृण हत्या करत तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले होते. हा गुन्हा समोर आल्यानंतर अशाच प्रकारचे अनेक गुन्हे देशाच्या विविध भागात घडलेले पाहायला मिळाले. सदर गुन्ह्यात आरोपींना अतिशय कठोर शिक्षा होऊनही अशाप्रकारचे गुन्हे थांबत नाहीत. झारखंडमध्ये श्रद्धा वालकर घटनेसारखी धक्कादायक घटना घडली आहे. खुंती जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणाने त्याच्यासह लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा निर्घृण खून करत तिच्या मृतदेहाचे ५० तुकडे केले. २४ नोव्हेंबर रोजी भटक्या कुत्र्यांनी जंगल परिसरातून मृतदेहाचे तुकडे शोधल्यानंतर या गुन्ह्याची उकल झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रकरण काय आहे?

आरोपीचे नाव नरेश भेंगरा असून तो पीडित महिला गंगी कुमारी (२४) सह लिव्ह इनमध्ये राहत होता. दोघेही झारखंडमधील जोरडाग गावातील रहिवासी होते, मात्र कामानिमित्त तमिळनाडूमध्ये राहत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही काही वर्षांपासून लिव्ह इन संबंधात होते. मात्र नरेशने गंगीला माहिती न देता खुंटी जिल्ह्यातील दुसऱ्याच महिलेशी लग्नगाठ बांधली. त्यानंतर तो पुन्हा तमिळनाडूला परतला आणि गंगी कुमारीसह राहू लागला.

सदर गुन्हा ८ नोव्हेंबर रोजी घडला. जेव्हा नरेश आणि गंघी दोघेही झारखंडमधील गावी परतले होते. तेव्हा गंगीने त्याला त्याच्या घरी नेण्यास सांगितले. पण नरेशने यासाठी नकार दिला. यावरून दोघांमध्ये भांडण झाले. गंगीने मध्येच पैशांचा विषय काढून त्याला आतापर्यंत दिलेले पैसे परत मागितले. यानंतर आरोपी नरेशने गंगीला त्याच्या घराजवळ असलेल्या जंगल परिसरात नेले. तिथे तिच्या ओढणीने गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर धारधार शस्त्राने तिच्या शरीराचे ५० तुकडे केले आणि जंगलात फेकून दिले.

२४ नोव्हेंबर रोजी भटक्या कुत्र्यांनी जंगल परिसरातून मानवी शरीराचे अवशेष बाहेर आणल्यानंतर लोकांना याबद्दल माहिती मिळाली, अशी माहिती पोलिसांनी पीटीआयशी बोलताना दिली. पोलिसांनी जंगल परिसरात झाडाझडती केली असता त्यांना गंगी कुमारीची बॅग आढळून आली. ज्यामध्ये तिचे आधार कार्ड, फोटो आणि इतर वस्तू होत्या. बॅग पीडित तरुणी गंगीचीच असल्याची माहिती तिच्या आईने दिली. या बॅगेजवळच रक्ताने माखलेला विळा आणि कुदळ आढळून आली. चौकशीनंतर नरेश भेंगराला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला. नरेश भेंगरावर खून आणि इतर कलमांच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jharkhand man kills live in partner chops body into 50 pieces dog finds remains kvg