दुमका जिल्ह्य़ात एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांची हत्या करण्यात आल्यानंतर राज्यात नक्षलवाद्यांविरुद्धची मोहीम अधिकाधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती झारखंडचे पोलीस प्रमुख राजीवकुमार यांनी दिली.
झारखंड सशस्त्र दल पोलीस संकुलात पाकूरचे पोलीस अधीक्षक अमरजीत बलिहार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केल्यानंतर राजीवकुमार यांनी वार्ताहरांना सांगितले की, नक्षलवाद्यांविरुद्ध राज्यव्यापी मोहीम अधिकाधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पाकूर आणि दुमका जिल्हे नक्षलग्रस्त जिल्हे म्हणून घोषित करण्यात आल्याने राज्यातील एकूण २४  जिल्ह्य़ांपैकी २० जिल्हे आता नक्षलग्रस्त म्हणून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. त्यापूर्वी राज्यपाल सय्यद अहमद यांनी बलिहार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले.
नक्षलवाद्यांकडून विद्यार्थ्यांची भरती
रायपूर : दहशतवादी कारवायांचा पाया विस्तारण्यासाठी छत्तीसगढमधील नक्षलवाद्यांनी शाळकरी मुलांची भरती सुरू केली आहे. ‘बाल कृती गट’ (बॅट) असे या मोहिमेचा नाव आहे. बस्तर जिल्ह्य़ात गेले काही महिने ‘बॅट’ कार्यरत आहे. रसद पोहोचविणे, माहिती व संदेशांची देवाणघेवाण तसेच प्रसंगी लष्करी कारवाईत ढालीसारखा केला जात आहे.