कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांकडून केले जाते. बरेचदा आंदोलन, मोर्चा, संप अशा गोष्टी मोडित काढण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा फवारा वा अश्रुधूर यांचा वापर केला जातो. थोडक्यात, जमलेल्या गर्दीची पांगापांग करणे हा यामागचा उद्देश असतो. मात्र, पोलिसांनी पोलिसांवरच लाठीचार्ज केल्याची घटना तशी दुर्मिळच म्हणावी लागेल. झारखंडमध्ये आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या पोलिसांवर पोलिसांनीच लाठीचार्ज केला आहे. पीटीआयने याबाबतचे वृत्त दिले आहे.
हेही वाचा : भारतातील विमान सेवेवरही मोठा परिणाम; विमान प्रवास करणाऱ्यांसाठी एअरलाईन्सने दिल्या महत्त्वाच्या सूचना
झारखंड राज्यातील सहायक पोलीस कर्मचारी (एसपीओ) मुख्यमंत्र्यांच्या रांची येथील निवासस्थानाबाहेर आपल्या मागण्यांसाठी निदर्शने करत होते. झारखंड पोलिसांनी पोलिसांचेच हे आंदोलन मोडून काढण्यासाठी आज शुक्रवारी (१९ जुलै) त्यांच्यावर लाठीचार्ज केला आहे. आंदोलन करणारे हे एसपीओ पोलीस सध्या कंत्राटी पद्धतीने नोकरीवर आहेत. त्यामुळे, या पोलिसांना इतर पोलिसांप्रमाणे सर्व सरकारी सेवा-सुविधा प्राप्त होत नाहीत. तसेच त्यांना वेतनही अल्प मिळते.
नेमके काय घडले?
गेल्या अनेक दिवसांपासून झारखंडमधील सहायक पोलीस कर्मचाऱ्यांकडून या मागण्या केल्या जात आहेत. पगारवाढीसह आठ मागण्या त्यांनी लावून धरल्या आहेत. मात्र, त्यांच्या कोणत्याच मागण्यांकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याने आज या पोलीसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. आज आंदोलक पोलिसांनी मुख्यमंत्री निवासस्थानाला सर्व बाजूने घेरण्याचे ठरवले. त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाच्या संरक्षणासाठी लावलेले बॅरिकेड्स तोडून सुरक्षा यंत्रणा मोडण्याचा प्रयत्न केला. त्या दरम्यानच आंदोलक पोलीस आणि तैनात असलेले पोलीस यांच्यामध्ये धुमश्चक्री पहायला मिळाली. आंदोलक पोलिसांनी पोलिसांच्याच वाहनांची नासधुस केल्याचा आरोप केला जात आहे. याच दरम्यान पोलिसांनी आंदोलक पोलिसांवर लाठीचार्ज केला. या लाठीचार्जमध्ये काही जण जखमी झाले आहेत. सध्या हे आंदोलन नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत; मात्र, हे आंदोलक पोलिस रस्त्यावर ठाण मांडून बसल्याची माहिती आहे.
काय आहेत मागण्या?
आंदोलन करणाऱ्या पोलिसांनी मुख्यमंत्र्यांसमोर काही मागण्या ठेवल्या आहेत. आपल्याला कायमस्वरूपी नोकरी मिळावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. या मागणीसह विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी हे पोलीस मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने करत आहेत. पगारवाढ आणि नोकरीवर नियमित करण्याच्या मागणीसाठी या सहायक पोलिस कर्मचाऱ्यांनी रांचीमध्ये आंदोलन केले आहे. त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीचार्ज केला.