झारखंडमधील रांची येथे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गर्भवती महिलेला रक्ताऐवजी सलाईन दिल्याने तिचा मृत्यू झाला असा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. तर रुग्णालय प्रशासनाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

रांचीतील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या रुग्णालयात उर्मी देवी या गर्भवती महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ‘माझ्या पत्नीला उपचारादरम्यान रक्ताची गरज होती. मात्र तिला रक्ताऐवजी सलाईन लावण्यात आली. प्रकृती खालावल्याने आम्ही तिला इमर्जन्सी विभागातून महिलांच्या विशेष वॉर्डात नेले. मात्र योग्य उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला’ असा आरोप महिलेच्या पतीने केला आहे.

रुग्णालयाचे प्रमुख एस के चौधरी यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. महिलेला पहाटे पाचच्या सुमारास रक्त देण्यात आले. तिला अ‍ॅनेमियाने ग्रासले होते आणि तिच्या रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाणही कमी होते असे त्यांनी सांगितले. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर यापूर्वीही हलगर्जीपणाचे आरोप झाले आहेत. याच महिन्यात रुग्णालयातील एका महिलेच्या मूत्रपिंडावर शस्त्रक्रिया झाली होती. महिलेच्या उजव्या किडनीऐवजी डॉक्टरांनी डाव्या किडनीवर शस्त्रक्रिया केली असा आरोप नातेवाईकांनी केला होता. तर एक वर्षाच्या मुलाला पैशांअभावी उपचार मिळाले नव्हते. उपचारासाठी विलंब झाल्याने मुलाचा मृत्यू झाला असा आरोप मुलाच्या वडिलांनी केला होता.

Story img Loader