रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यात ३८ जागांसाठी बुधवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ६८ टक्के मतदान झाले. १२ जिल्ह्यांतील १४ हजार २१८ मतदान केंद्रांवर मतदान शांततेत झाले. राज्यात सत्तारूढ झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्वाखालील ‘इंडिया ’ आघाडीचा सामना भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीत मुख्य लढत आहे. दोन संस्थांचा अपवाद वगळता बहुसंख्य मतदानोत्तर चाचण्यांनी राज्यात सत्तांतर होईल असे भाकीत वर्तवले आहे.
हेही वाचा : ‘बिटकॉइन’प्रकरणी छत्तीसगडमध्ये छापे, कथित घोटाळ्याचे राजकीय लागेबांधे असल्याचा ‘ईडी’ला संशय
मतदानोत्तर चाचण्यांची सरासरी पाहिली तर राज्यात भाजप ४५ जागा जिंकेल असा अंदाज वर्तवला आहे. झारखंड मुक्ती मोर्चाला सत्ताविरोधी लाटेचा फटका बसेल असा (पान ८ वर) (पान १ वरून) या चाचण्यांचा अंदाज आहे. राज्यातील प्रचारात भाजपने मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना लक्ष्य केले होते. त्याचबरोबर घुसखोरीची समस्या केंद्रस्थानी ठेवत, प्रचारात हिंदुत्वाचा मुद्दा जोरदारपणे मांडला होता. झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य असलेले माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन हे निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दाखल झाले होते. राज्यातील आदिवासी समुदायाच्या लोकसंख्येत बदल झाल्याचा आरोप भाजपने प्रचारात करत विरोधी इंडिया आघाडीपुढे आव्हान उभे केले.