“मी पाच मिनिटांत घरी पोहचते आहे, माझा नाश्ता तयार ठेवशील आई.” फोनवर तिचे हे शेवटचे शब्द होते. त्यानंतर तिला पाहिलंच नाही असं सांगताना जिगिषाच्या आईला अश्रू अनावर झाले. जिगिषा घोषची आई सविता घोष यांनी सौम्या विश्वनाथन प्रकरणातल्या आरोपींना दोषी ठरवल्यानंतर ही प्रतिक्रिया दिली आहे. सौम्या आणि जिगिषा यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे जुळलेले आहेत ही माहिती पोलिसांनीच दिली. ज्या पाच आरोपींना दोषी ठरवण्यात आलं. त्यातले तीन आरोपी हे जिगिषा घोष हत्या प्रकरणातलेही दोषी आहेत. जिगिषा तिच्या ऑफिसमधून घरी परतत असताना या तिघांनी तिची हत्या केली.
२००९ मध्ये जिगिषा घोषची हत्या
आयटी क्षेत्रात काम करणारी जिगिषा घोष ही मुलगी २००९ मध्ये वसंत विहार भागात असलेल्या तिच्या घरी येत होती. त्यावेळी तिला काही लोकांनी पळवलं आणि तिची हत्या केली. त्यादिवशी तिने अमेरिकेतल्या एका प्रोजेक्टचं प्रेझेंटशन दिलं आणि ती घरी परतत होती. सौम्या विश्वनाथन आणि जिगिषा घोष यांच्या हत्येचा पॅटर्न सारखाच होता असंही पोलिसांनी सांगितलं.
हे पण वाचा- पत्रकार सौम्या विश्वनाथन हत्या प्रकरणी पाचही आरोपी दोषी, साकेत कोर्टाचा मोठा निर्णय
जिगिषाच्या खुन्यांना पोलिसांनी कसं पकडलं?
जिगिषाच्या आईने सांगितलं की पोलिसांना जिगिषाचे काही दागिने आणि तिचा मोबाइल यांसह काही ठोस पुरावे मिळाले. तिचं कार्ड वापरुन ज्या गोष्टी खरेदी केल्या त्याचीही माहिती मिळाली. आरोपींनी जिगिषाचं कार्ड वापरुन टोपी, रिस्ट वॉच आणि बूट खरेदी केले होते. माझी मुलगी हॉरिझाँटल सही करायची, मात्र आरोपी रवि कपूरने व्हर्टिकल सही केली. ही सही हा एक महत्त्वाचा पुरावा कार्ड वापराच्याबाबतीत पोलिसांना मिळाला.
दिल्ली पोलिसांना जेव्हा आरोपींकडे सौम्या विश्वनाथवर गोळ्या झाडण्याचे आणि लुटीचे पुरावे मिळाले तेव्हाच त्यांना जिगिषाच्या हत्येविषयीचेही पुरावे मिळाले असंही सविता घोष यांनी सांगितलं. एनडीटीव्हीने या विषयीचं वृत्त दिलं आहे.