नवी दिल्ली : जिहाद ही संकल्पना केवळ इस्लाममध्ये नसून भगवद्गीता आणि ख्रिश्चन धर्मातही आहे, असे विधान ज्येष्ठ काँग्रेस नेते शिवराज पाटील यांनी केले. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री मोहसिना किडवई यांच्या चरित्राचे प्रकाशन सोहळय़ात ते बोलत होते. भाजपने या विधानावर जोरदार टीका केली आहे.
माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री पाटील म्हणाले की, ‘‘इस्लाम धर्मात असलेल्या जिहाद या संकल्पनेबाबत अनेकदा बोलले जाते. हेतू चांगला असेल, काही चांगले करायचे असेल आणि ते कुणी मान्य करत नसेल तर बळाचा वापर केला जाऊ शकतो, अशी ही संकल्पना आहे. केवळ कुराणच नव्हे, तर महाभारतातील गीतेमध्ये आणि ख्रिश्चन धर्मातही हेच सांगितले आहे.’’
या विधानावरून भाजपने काँग्रेसला लक्ष्य केले आहे. ‘काँग्रेसने भगवा दहशवाद संकल्पनेला जन्म दिला, राममंदिराला विरोध केला, प्रभू रामचंद्राच्या अस्तित्वावर संशय घेतला, हिंदूत्वाची तुलना आयसिसशी केली’ असे ट्विट भाजप नेते शहेजाद पुनावाला यांनी केले.