एक्स्प्रेस वृत्तसेवा, सिंगापूर : सिंगापूरमधील गेल्या काही वर्षांपासून नावाजलेल्या ‘झिलिंगो पीटीई’ या कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून भारतीय वंशाच्या अंकिती बोस यांना हटवले आहे. नवीन निधी मिळवण्याच्या प्रयत्नात गैरव्यवहार झाला असून त्यामुळे कंपनीच्या एकूण टाळेबंदाबाबत प्रश्न निर्माण झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.
‘जिलिंगो पीटीई’ ही नवउद्योग कंपनी असून मोठे व्यापारी आणि कारखान्यांना तंत्रज्ञान पुरवण्याचे काम या कंपनीकडून केले जाते. या कंपनीने गोल्डमन सॅच ग्रुप इंक.च्या सहाय्याने १५ ते २० कोटी डॉलर गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र गुंतवणूकदारांनी या निधीबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. मात्र ही माहिती गोपनीय असल्याचे सांगून गुंतवणूकदारांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. त्यामुळे झिलिंगो कंपनीचे मूल्यांकन १०० कोटी डॉलर झाले.
या कंपनीच्या अन्य गुंतवणूकदारांनी यास आक्षेप घेतला आणि कंपनीच्या लेखापरीक्षकांनी कंपनीच्या टाळेबंदावर प्रश्न उपस्थित केले. या कंपनीने वार्षिक आर्थिक विवरणपत्रही सादर केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे अंकिती बोस यांच्या एकूण व्यवहारावर प्रश्न निर्माण झाल्याने बोस यांना निलंबित करण्यात आले.
वयाच्या २३ व्या वर्षी कंपनीची स्थापना
अंकिती बोस ई-कॉमर्स क्षेत्रातील बहु-राष्ट्रीय स्टार्ट-अप झिलिंगोच्या सह-संस्थापक आणि सीईओ आहेत. वयाच्या २३ व्या वर्षी म्हणजे २०१५ मध्ये त्यांनी या कंपनीची स्थापना केली. मुंबईतील कांदिवली येथील केंब्रिज स्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले, तर सेंट झेवियर्स महाविद्यालयात गणित व अर्थशास्त्रात पदवी. गेल्या काही वर्षांत त्यांच्या कंपनीने मोठे यश मिळवले आहे.