PM Modi’s Gift To Jill Biden : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जून २०२३ मध्ये अमेरिकेचा दौरा केला होता. यावेळी त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि जिल बायडेन यांना अनेक भेटवस्तू दिल्या होत्या. यामध्ये एका ७.५ कॅरेटच्या सिंथेटिक हिऱ्याचाही समावेश होता. ज्याची किंमत २० हजार अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. दरम्यान पंतप्रधान मोदींनी दिलेला हिरा अमेरिकेचे अध्यक्ष आणि त्यांच्या कुटुंबीयांना २०२३ मध्ये मिळालेली सर्वात महागडी भेटवस्तू होती, अशी माहिती अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटने दिली आहे. असे असले तरी, जो बायडेन यांच्या पत्नी जिल बायडेन हा हिरा वैयक्तिकरित्या वापरू शकणार नाहीत. कारण कारण तो व्हाईटच्या ईस्ट विंगमध्ये अधिकृत वापरासाठी ठेवण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल बायडेन यांच्या प्रवक्त्याने असोसिएटेड प्रेस या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, सुरतमध्ये पॉलिश करण्यात आलेला हा हिरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वी २० जानेवारीला राष्ट्रीय अभिलेखागाराकडे (National Archives) सुपूर्द करण्यात येणार आहे.

नियमांनुसार, बायडेन यांनी पद सोडल्यानंतर त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांना पतीच्या कार्यकाळात मिळालेल्या भेटवस्तू अमेरिकन सरकारकडू खरेदी करण्याचा पर्याय असणार आहे. अमेरिकन कायद्यानुसार, फर्स्ट फॅमिलीला परदेशी अधिकाऱ्यांकडून ४८० अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक किमतींच्या भेटवस्तूंची माहिती सरकारला द्यावी लागते. पण यापेक्षा कमी किमतींच्या भेटवस्तू वैयक्तिक वापरासाठी फर्स्ट फॅमिली घेऊन जाऊ शकते. पण, महागड्या भेटवस् राष्ट्रीय अभिलेखागाराकडे हस्तांतरित केल्या जातात.

जो आणि जिल बायडेन यांना पंतप्रधानांनी दिलेल्या भेटवस्तू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जून २०२३ रोजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासह अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि त्यांच्या पत्नी जिल बायडेन यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली होती. त्यावेळी अधिकृत भेटवस्तू म्हणून, पंतप्रधानांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना हस्तकलेद्वारे तयार करण्यात आलेला चंदनाचा बॉक्स आणि जिल बायडेन यांना ७.५ कॅरेटचा पर्यावरणपूरक हिरा दिला होता.

गेल्या नोव्हेंबरमध्ये ८१ वर्षांचे झालेले जो बायडेन यांना भेट दिलेल्या चंदनाच्या बॉक्समध्ये गणपतीची चांदीची मूर्ती, एक दिवा आणि ‘दास दानम’चा समावेश होता. एखादी व्यक्ती वयाची ८० वर्षे आणि ८ महिने पूर्ण करते तेव्हा त्याला दिलेल्या भेटवस्तूला ‘दास दानम’ म्हणतात. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांना ‘द टेन प्रिन्सिपल उपनिषद’ या पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीची प्रतही भेट दिली होती.

दुसरकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अध्यक्ष जो बायडेन आणि जिल बायडेन यांच्याकडून एक विंटेज अमेरिकन कॅमेरा, अमेरिकन वन्यजीव फोटोग्राफीचे पुस्तक आणि रॉबर्ट फ्रॉस्टच्या संग्रहित कवितांच्या पहिल्या आवृत्तीची प्रतही देण्यात आली होती. ज्यावर रॉबर्ट फ्रॉस्ट स्वाक्षरी होती.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jill biden joe biden pm narendra modi diamond most expensive gift aam