कोणतीही पूर्वपरवानगी न घेता स्वत:च्या जाहिरातीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र वापरल्याप्रकरणी रिलायन्स जिओला ५०० रूपयांचा दंड ठोठाविण्यात येण्याची शक्यता आहे. बोधचिन्हे आणि नावांचा गैरवापर टाळण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कायद्यातंर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे. मात्र,  दंडाची रक्कम अत्यंत क्षुल्लक असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रिलायन्स जिओच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरण्याची परवानगी दिली नसल्याचे समोर आले होते. माहिती व प्रसारण मंत्रालयाचे राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी गुरूवारी संसदेत ही माहिती दिली होती. यासंबंधी समाजवादी पक्षाचे खासदार नीरज शेखर यांनी राज्यसभेत प्रश्न विचारला. त्यावर माहिती व प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन राठोड यांनी लेखी उत्तर देताना ‘जिओ’च्या जाहिरातीत पंतप्रध‍ान मोदींचा फोटो वापरण्याची परवानगी पीएमओ कार्यालयाकडून देण्यात आली नाही, अशी माहिती दिली. तसेच या जाहिरातींमध्ये मोदी यांचा फोटो वापरण्यात येत आहे, याबाबत माहिती होती, अशी कबुलीही त्यांनी दिली होती.

मंत्रालयाची मीडिया शाखा असलेल्या ‘डीएव्हीपी’कडून सरकारच्या धोरणाशी संबंधित सर्व जाहिरातींना विविध प्रसारमाध्यमांतून प्रसारित करण्यात येतात. मात्र, केवळ सरकारी जाहिरातींचाच त्यात समावेश असतो. कोणत्याही प्रकारच्या खासगी संस्थांच्या जाहिराती प्रसारित करण्याचे काम ही मीडिया संस्था करत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. राठोड यांच्या माहितीनंतर शेखर यांनी जिओविरुद्ध कारवाईबाबत प्रश्न उपस्थित केला. जिओच्या जाहिरातीत पंतप्रधान मोदींचा फोटो वापरण्याची परवानगी घेतली नसल्याने त्यांच्याविरोधात कोणत्या प्रकारची कारवाई होईल, असे त्यांनी विचारले. त्यावर याबाबतचा कायदा अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या अखत्यारित आहे, असे उत्तर राठोड यांनी दिले.

दुसरीकडे, जिओच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरण्यावरील आक्षेपाबाबत उद्योजक मुकेश अंबानी यांनी उत्तर दिले आहे. मोदी हे आमचेही पंतप्रधान आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडियाचे स्वप्न पाहिले आहे आणि मीही त्यामुळे प्रेरित झालो आहे. आम्ही या भारतीय नेत्याचे स्वप्न, भारत आणि भारतीयांना आमची सेवा समर्पित करत आहोत आणि त्यात काही राजकीय नाही, असे अंबानी म्हटले होते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jio could face rs 500 fine for using pm modis pic in print and electronic advertisements without permission