‘द कश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून त्यावरून वाद निर्माण झाला आहे. चित्रपटामध्ये काश्मिरी पंडितांना १९९० साली सहन कराव्या लागलेल्या यातनांना वाचा फोडण्यात आली आहे. मात्र, त्यावरून आता पुन्हा देशात धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचं चित्र उभं राहिलं आहे. त्यामुळे चित्रपटाला काही भागात विरोध देखील होत असला, तरी केंद्रातील सत्ताधारी भाजपाकडून चित्रपटाचं जोरदार समर्थन केलं जात आहे. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील हा चित्रपट सगळ्यांनी पाहायला हवा, असं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रात भाजपासोबत सत्तेत असलेल्या एका मित्रपक्षाकडून खळबळजनक दावा करण्यात आला आहे. तसेच, ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाशी संबंधित सर्वांची चौकशी करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे.
केंद्रातील एनडीएमध्ये एक मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावर गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात ट्वीट करत मांझी यांनी आपली भूमिका मांडली आहे.
‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपट बनला तसा ‘लखीमपूर फाईल्स’ही बनायला हवा; अखिलेश यादवांची मागणी
‘द कश्मीर फाईल्स’चं दहशतवादी कनेक्शन?
जितन राम मांझी यांनी ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या टीमचे दहशतवाद्यांशी कनेक्शन असल्याचा दावा केला आहे. “‘द कश्मीर फाईल्स’ दहशतवाद्यांचा एक मोठा कट देखील असू शकतो. जेणेकरून हा चित्रपट पाहून काश्मिरी ब्राह्मणांमध्ये भीती आणि दहशतीची भावना कायम ठेवण्यात दहशतवादी संघटना यशस्वी होती. यामुळे काश्मिरी पंडित कधीच काश्मीरला जाऊ शकणार नाहीत. ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटाच्या युनिटच्या सर्व सदस्यांची दहशतवाद्यांशी कनेक्शन आहे किंवा नाही, यासंदर्भात चौकशी व्हायला हवी”, असं जितन राम मांझी यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे.
दरम्यान, एकीकडे ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटावरून वाद निर्माण झालेला असताना दुसरीकडे चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांना वाय दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय केंद्रीय पातळीवर घेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.