बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवानंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. भाजप खासदार हुकूमदेव नारायण यादव यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य चुकीच्या वेळी केल्याचे सांगितले, तर माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी यांनीही पराभवाला भागवत यांचे वक्तव्य जबाबदार धरले.
निवडणुकीच्या काळात असे वक्तव्य यायला नको होते. लालूप्रसाद यादव यांनी या वक्तव्याचा लाभ उठवला, असा निष्कर्ष मांझी यांनी काढला. लालूप्रसादांच्या वक्तव्यावर जनतेने विश्वास ठेवल्याचे मांझी यांनी सांगितले. मांझी यांचा हिंदुस्तान अवाम मोर्चा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे. आम्ही जनतेपुढे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा फायदा झाला नाही.
लोकजनशक्ती पक्षाचे सरचिटणीस अब्दुल खलिक यांनीही भागवत यांच्या वक्तव्याने यादव मते राष्ट्रीय जनता दलाच्या पाठीमागे गेल्याचे सांगितले. तर दादरी घटनेनंतरच्या वक्तव्यांनी मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्याचा आरोप त्यांनी करीत भाजपवर खापर फोडले. लोकजनशक्ती पक्षाचे प्रभावक्षेत्र असलेल्या भागातही मुस्लीम मते राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे वळली नसल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी हरयाणातील दोन दलित मुलांच्या घटनेवरून केलेले वादग्रस्त वक्तव्यही अडचणीचे ठरल्याची टीका केली.