Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या एकदिवसीय विशेष अधिवेशनात, सरकार आणि विरोधकांनी एकमताने तीन पानांचा एक ठराव मंजूर केला आहे. या ठरावात, “देश व जम्मू आणि काश्मीरचा सांप्रदायिक सलोखा तसेच प्रगतीला अडथळा आणू पाहणाऱ्यांच्या नापाक हेतूंना दृढनिश्चयाने पराभूत करण्याचा” निश्चय करण्यात आला आहे.
उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी मांडलेल्या या ठरावात असे म्हटले आहे की “अशी दहशतवादी कृत्ये काश्मिरीयतच्या नीतिमत्तेवर, आपल्या संविधानात असलेल्या मूल्यांवर, जम्मू आणि काश्मीर व आपल्या देशाचे दीर्घकाळ वैशिष्ट्य असलेल्या एकता, शांती आणि सौहार्दाच्या भावनेवर थेट हल्ला आहेत”.
या हल्ल्याने पहिल्यांदाच जम्मूतील कठुआपासून काश्मीरमधील कुपवाडापर्यंतच्या लोकांना एकत्र आणले आहे. हे लक्षात घेऊन, सभागृहाने ते “पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत असल्याचे” सांगितले.
“हे सभागृह शहीद सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या सर्वोच्च बलिदानाला अभिवादन करते, ज्यांनी पर्यटकांना वाचवण्यासाठी धाडसी प्रयत्न करताना आपले प्राण गमावले. त्यांचे धाडस आणि निस्वार्थता काश्मीरच्या खऱ्या भावनेला मूर्त रूप देते. ते भविष्यातील पिढ्यांसाठी एक चिरस्थायी प्रेरणा ठरतील,” असे ठरावात म्हटले आहे.
हल्ल्यानंतर केंद्र सरकारने सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीनंतर जाहीर केलेल्या राजनैतिक उपाययोजनांना या ठरावाद्वारे पाठिंबा देण्यात आला. “या हल्ल्यातील मृतांना लक्ष्य करण्यामागील भयानक हेतूची जाणीव या सभागृहाला आहे,” असे ठरावात म्हटले आहे.
यावेळी, देशातील विविध भागांत राहणाऱ्या काश्मिरी विद्यार्थ्यांची आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी विधानसभेने राज्य सरकारांना आवाहन केले.
तत्पूर्वी, विधानसभेच्या विशेष अधिवेशनात बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले, “या घटनेचा संपूर्ण देशावर परिणाम झाला आहे. आपण असे अनेक हल्ले यापूर्वी पाहिले आहेत. पहलगामच्या बैसरणमध्ये २१ वर्षांनंतर इतका मोठ्या हल्ला झाला आहे. मृतांच्या कुटुंबियांची माफी कशी मागावी हे मला समजत नाही. यजमान असल्याने, पर्यटकांना सुरक्षित परत पाठवणे हे माझे कर्तव्य होते. मी ते मी पार पाडू शकलो नाही. माझ्याकडे माफी मागण्यासाठी शब्द नाहीत.”
२२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगामजवळील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. २०१९ च्या पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यातील हा सर्वात घातक हल्ला असल्याचे मानले जाते. दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्यांपैकी बहुतेक पर्यटक होते.