काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात बुधवारी भारतीय सैन्यातील लेफ्टनंट दर्जाच्या एका अधिकाऱ्याचा मृतदेह सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. गोळ्यांनी संपूर्ण शरीराची चाळण झालेल्या अवस्थेत हा मृतदेह सापडला. उमर फयाज असे या मृत अधिकाऱ्याचे नाव असून ते कुलगाम येथे राहत होते. आज सकाळी शोपियान जिल्ह्यातील हरमन येथे त्यांचा मृतदेह सापडला. सूत्रांच्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी काल उमर फयाज यांचे अपहरण केले असावे. त्यानंतर उमर यांना गोळ्या घालून हरमन येथे त्यांचा मृतदेह फेकून दिला असावा. सध्या स्थानिक पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मात्र, या घटनेमुळे काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला होण्याचा धोका आणखी वाढला आहे.
उमर अलिकडेच डिसेंबर २०१६ मध्ये सैन्यात दाखल झाले होते. काल ते एका कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी गेले होते. उमर यांना इतक्या निर्घृणपणे का मारण्यात आले, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. काही दिवसांपूर्वीच कृष्णा घाटी सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती.
J&K: Bullet ridden body of a Army lieutenant found in Shopian district's Herman, in South Kashmir; identified as Umar Fayaz from Kulgam pic.twitter.com/lmeOU3Kgsa
— ANI (@ANI) May 10, 2017
काही दिवसांपूर्वीच काश्मीरच्या दोदा जिल्ह्यातील डोंगराळ भागात असणाऱ्या एका पोलीस चौकीवर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये दोन विशेष पोलीस अधिकारी गंभीर जखमी झाले होते. मात्र, हा हल्ला नेमका कुणी केला, हे समजू शकले नव्हते. हल्ला नेमका कसा झाला याबद्दल स्थानिक पोलिसांकडून गुप्तता बाळगण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तंटा गावात असणाऱ्या या चौकीबाहेर एके-४७ रायफलने गोळीबार करण्यात आला. रात्री पावणेदोनच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी चौकीतील पोलिसांना अचानक झालेल्या हल्ल्यातून सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही. गेल्या सात वर्षांत एकही दहशतवादी कारवाई न झाल्यामुळे दोदाला २०१० मध्ये दहशवादमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले होते. या परिसरातील अनेक गावांमध्ये स्थानिकांची सुरक्षा पथके तयार करण्यात आली आहेत. मात्र, यापैकी कोणाकडेही एके-४७ रायफल नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.