जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापनेच्या मुद्दय़ावर भारतीय जनता पक्ष आणि पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (पीडीपी) या दोन्ही पक्षांनी मंगळवार संध्याकाळपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे जम्मू-काश्मिरचे राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी स्पष्ट केले आहे. व्होरा यांनी भाजपच्या राज्यातील नेत्यांना मंगळवारी संध्याकाळी सहा वाजता राजभवनावर बोलावले आहे. त्यापूर्वी पीडीपीचे नेते दुपारी साडेचार वाजता राज्यपालांची भेट घेणार आहेत. भाजपचे राज्य सचिव अशोक कौल यांनीच ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला ही माहिती दिली.
जम्मू- काश्मीरमध्ये सरकार स्थापनेच्या मुद्दय़ावर विचार करण्यासाठी पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीच्या (पीडीपी) नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी बोलावलेल्या बैठकीत काही निर्णय न झाल्यामुळे राज्यात सरकार स्थापन होण्याबाबतची अनिश्चितता कायम आहे. पीडीपीसोबतच्या युतीची उद्दिष्टे तार्किक निष्कर्षांपर्यंत पोहोचवण्याबाबत भाजपने आपली खात्री पटवल्यानंतरच आपण या मुद्दय़ावर निर्णय घेऊ, असे सांगून मेहबुबा यांनी भाजपलाही प्रतीक्षा करायला लावले आहे. यापूर्वीचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर ८ जानेवारीपासून राज्यपाल राजवट लागू असलेल्या जम्मू- काश्मीरमध्ये नव्याने निवडणुका होऊ शकतील काय, हा ‘अनुमाना’चा भाग असल्याचे पक्षाने म्हटले आहे. मुफ्ती यांच्या वारसदार मानल्या जाणाऱ्या मेहबुबा यांनी सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी पक्षाचे खासदार, आमदार, विभागीय अध्यक्ष आणि ब्लॉक अध्यक्ष यांच्यासह पक्षनेत्यांची रविवारी सुमारे चार तास बैठक घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा