जम्मू-काश्मीरमध्ये पूरस्थिती गंभीर असून मुसळधार पाऊस आणि महापुराने आतापर्यंत १५० जणांचे बळी घेतले असून मोठय़ा प्रमाणावर लोकांनाही पूरस्थितीचा तडाखा बसला आहे. ठिकठिकाणी पूरस्थिती आटोक्यात आणण्यासाठी व्यापक प्रयत्न सुरू असतानाच या संकटातून सावरण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हजार कोटी रुपये मदतीची घोषणा रविवारी केली.
श्रीनगर शहरास पुराचा मोठा तडाखा बसला असून पुराच्या पाण्याने अनेक ठिकाणी रस्त्यांची हानी झाली आहे. ठिकठिकाणची दूरसंचार यंत्रणा विस्कळीत झाली असून शहरातील लष्करी कॅण्टोनमेण्ट, सचिवालय तसेच उच्च न्यायालयाच्या इमारतींची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी भारतीय हवाई दलाने २९ विमाने आणि हेलिकॉप्टर्स तैनात केली असून आतापर्यंत लष्कराने १२,५०० हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मात्र अजूनही काही भागांतील संपर्क खंडित झाल्यामुळे लोक अडकले असून त्यांच्या सुटकेसाठी तातडीचे प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिले.
राज्यात पूरस्थिती गंभीर असल्याची दखल घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी केली आणि हे ‘राष्ट्रीय संकट’ असल्याचे मत मांडले. पुरामुळे झालेली हानी आणि लोकांना सहन कराव्या लागलेल्या मनस्तापाची माहिती ओमर अब्दुल्ला आणि राज्य सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर मोदी यांनी त्यांच्या भावनांशी सहमती व्यक्त केली आणि पूरग्रस्तांना मदत तसेच त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य सरकारला अतिरिक्त एक हजार कोटी रुपये देण्यात येतील, अशीही घोषणा मोदी यांनी केली. राज्यातील पूरस्थितीची योग्य रीतीने छाननी झाल्यानंतर आवश्यकता भासल्यास आणखीही मदत निश्चितपणे दिली जाईल, असेही आश्वासन पंतप्रधानांनी दिले.
पाकव्याप्त काश्मीरलाही पुराचा प्रचंड तडाखा बसला असून मानवतावादी भूमिका घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बचावकार्यासाठी सर्वतोपरीने पाकिस्तानला सहकार्य करण्याचे जाहीर केले आहे.
शोकमग्न अवस्थेतच मोदी यांनी जम्मू व काश्मीरप्रमाणेच पाकव्याप्त काश्मीर प्रदेशातील पूरस्थितीतून मार्ग काढण्यासाठी पाकिस्तानला गरज भासल्यास भारत सरकारकडून बचावकार्यासाठी सर्वतोपरीने मदत केली जाईल, असे सांगितले.
मृतांची संख्या दीडशेवर
महापूर तसेच दुर्गम भागात भूस्खलन आणि घरे कोसळून आतापर्यंत सुमारे १५० लोक मृत्युमुखी पडले असल्याची माहिती जम्मू प्रांताचे उपविभागीय आयुक्त शांत मनू यांनी दिली. झेलम नदीला आलेल्या पुराच्या पाण्याने अनेक भागांत धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे पुराचे पाणी घराघरांमध्ये तसेच व्यापारी आस्थापनांमध्येही घुसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जम्मू-श्रीनगर महामार्ग बंद
श्रीनगर शहराच्या मध्यवर्ती भागातील लाल चौकास पाण्याने वेढा घातल्यामुळे तेथील व्यवहार पूर्णपणे थंडावले होते. सिव्हिल सेक्रेटरिएट आणि उच्च न्यायालय परिसरातील पुराच्या पाण्याची पातळी सहा ते आठ फुटांपर्यंत वाढली होती. राज्यात पडत असलेला मुसळधार पाऊस, खराब हवामान आणि पूरस्थिती यामुळे जम्मू ते श्रीनगरला जोडणारा ३०० किलोमीटर लांबीचा राष्ट्रीय महामार्ग गेले चार दिवस बंद पडला आहे.जम्मू परिसरात अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक बंद पडल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिक पर्यटक आणि अन्य वाहनांचा खोळंबा झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा