जम्मू-काश्मीर राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटण्याची चिन्हे अद्यापही दिसत नाहीत. विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या पीपल्स डेमोकॅट्रिक पक्षाला (पीडीपी) मंगळवारी नॅशनल कॉन्फरन्सने आपला पाठिंबा असल्याचे जाहीर केले होते. मात्र बुधवारी पीडीपीने हा प्रस्ताव स्वीकारण्यात फारसा रस दाखवला नाही. या प्रतिसादानंतर नॅशनल कॉन्फरन्सनेही घूमजाव करीत पीडीपीला केवळ बाहेरूनच पाठिंबा देण्याची आमची भूमिका होती, असा पवित्रा घेतला. तसेच सत्तेत जाता यावे यासाठी कोणत्याही थराला जाण्याची आणि कोणतीही तडजोड स्वीकारण्याची पीडीपीची तयारी आहे, अशी खरमरीत टीकाही केली.
‘‘नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची स्वतची तत्त्वे आहेत, स्वतच्या ठाम भूमिका आहेत. एका राजकीय विचारधारेने पक्ष बांधला गेला आहे आणि लोकांच्या इच्छा आणि आकांक्षांचे प्रतिबिंब आमच्या निर्णयप्रक्रियेवर पडलेले पाहावयास मिळेल. आम्ही म्हणजे तत्त्वशून्य पीडीपी नाही,’’ अशी टीका नॅशनल कॉन्फरन्सचे सरचिटणीस अली मोहंमद सागर यांनी केली. पीडीपीने आम्हाला गृहीत धरू नये. सत्तेत जाण्यासाठी ते आतुर असतील, आम्हाला सत्तेत जाण्याची लालसा नाही आणि म्हणूनच पक्षाने केवळ बाहेरूनच पाठिंबा देण्याची तयारी दाखवली होती, असे सागर यांनी स्पष्ट केले.

पीडीपीचे दुर्लक्ष
राज्यात निवडणुकीआधी नॅशनल कॉन्फरन्सचीच सत्ता होती. लोकांनी त्यांना १५ जागांवर विजयी केले आणि राज्यात सत्ताबदल अनिवार्य असल्याची भावना व्यक्त केली. या जनमताच्या विरोधात जात नॅशनल कॉन्फरन्सला सरकार स्थापनेबाबत भूमिका घेऊ देणे आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका पीडीपीचे मुख्य प्रवक्ते नईम अख्तर यांनी जाहीर केली. माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पाठविलेल्या पत्राबाबत विचारलेल्या प्रश्नास अख्तर उत्तर देत होते.

..तर आम्ही तेव्हाच सत्तेत गेलो असतो!
सत्तेच्या लालसेपेक्षा विचारधारेशी असलेली बांधीलकी आमच्यादृष्टीने अधिक महत्त्वाची आहे. पीडीपीला काहीही करून सत्तेत येण्याची आस आहे. आम्हाला जर सत्तेत यायचे असते तर निवडणुकीचे निकाल लागले त्याचवेळी भाजपसह आघाडी करून आम्ही सत्तेत आलो असतो, असे सागर यांनी म्हटले आहे.