बिहारमधील तापलेलं राजकारण थंड होत नाही, तोच बिहारच्या शेजारी असलेल्या झारखंडमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला आहे. सक्तवसुली संचानालयाने (ईडी) झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची बुधवारी (३१ जानेवारी) नऊ तास चौकशी केली. त्यानंतर सोरेन यानी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यापाठोपाठ त्यांना ईडीने अटक केली. दरम्यान, आज त्यांना ईडीच्या न्यायालयात हजर करण्यात आलं. या अटकेनंतर झारखंड मुक्ती मोर्चाने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. सर्वोच्च न्यायालय याप्रकरणी शुक्रवारी सुनावणी करणार आहे. दुसऱ्या बाजूला झारखंड मुक्ती मोर्चाने चंपई सोरेन यांची सभागृह नेतेपदी नियुक्ती केली आहे. चंपई सोरेन आता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची तयारी करत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंपई सोरेन यांनी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे. त्याचबरोबर ४७ आमदारांच्या पाठिंब्याचं पत्रदेखील राज्यपालांकडे सुपूर्द केलं आहे. परंतु, राज्यपालांनी अद्याप चंपई सोरेन यांना शपथ ग्रहण करण्यासाठी आमंत्रित केलेलं नाही. दुसऱ्या बाजूला भाजपाच्या गोटात बैठकांची सत्र चालू आहेत. त्यामुळे आमदार फूटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच चंपई सोरेन यांनी त्यांच्या सर्व सहकारी आमदारांना रांचीतल्या सर्किट हाऊसवर नेलं आहे. चंपई सोरेनदेखील तिथेच आहेत. सोरेन आणि झारखंड मुक्ती मोर्चाला राज्यपालांच्या आमंत्रणाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, भाजपाने दावा केला आहे की बहुमत गाठता येईल इतके आमदार चंपई सोरेन यांच्याबरोबर नाहीत. तसेच राज्यपाल देखील सत्तास्थापनेचं आमंत्रण देईनात. अशा परिस्थितीत चंपई सोरेन यांनी आमदारांची परेड केली. या परेडद्वारे ४३ आमदार त्यांच्याबरोबर असल्याचं सोरेन यांनी सिद्ध केलं आहे. या परेडचा व्हिडीओ सोरेन यांनी समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. परेडदरम्यान, या सर्व आमदारांनी सांगितलं की, ते चंपई सोरेन यांच्याबरोबर आहेत. ही परेड प्रसारमाध्यमांसमोर पार पडली. दरम्यान, ही परेड पाहून राज्यपाल त्यांना सत्तास्थापनेचं आमंत्रण पाठवतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आमदारांच्या परेडचा व्हिडीओ जारी केल्यानंतर चंपई सोरेन म्हणाले, आम्हाला आता केवळ राज्यपालांच्या आमंत्रणाची प्रतीक्षा आहे.

चंपई सोरेन यांचा प्लॅन बी तयार?

कर्नाटक, महाराष्ट्र आणि बिहारमधील सत्तांघर्षावरून धडा घेत चंपई सोरेन आणि काँग्रेसने त्यांचा ‘प्लॅन बी’ सज्ज केला आहे. चंपई सोरेन यांना राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं नाही तर झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस त्यांच्या आमदारांना तेलंगणात हालवणार आहे. हैदाराबाद विमानतळावर बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच रांचीहून हैदराबादला जाण्यासाठी खासगी विमानाची (चार्टर्ड प्लेन) व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. एएनआयने यासंबंधीचा एक व्हिडीओ जारी केला आहे.

हे ही वाचा >> “…तर वाराणसी मतदारसंघात मोदींच्या पराभवासाठी मोहीम सुरू होईल”, भाजपा नेत्याचा पंतप्रधानांना इशारा

दरम्यान, भारतीय जनता पार्टीने उद्या (२ फेब्रुवारी) सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. भाजपाच्या गोटात कोणत्या राजकीय योजना आखल्या जात आहेत, याकडे चंपई सोरेन, काँग्रेस आणि प्रसारमाध्यमांचं लक्ष लागलं आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jmm congress led alliance releases 43 mlas parade video while jharkhand amid political crisis asc