साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च सन्मान असलेला ज्ञानपीठ पुरस्कार निवडीत दरवेळी राजकारण होत असते. अनेक प्रादेशिक लेखक आपापल्या नावासाठी समितीवर दबाव टाकत असतात. मात्र, या राजकारणाला न जुमानता भालचंद्र नेमाडे यांना पुरस्कार समितीने ज्ञानपीठ घोषित केला, असे पुरस्कार समितीचे अध्यक्ष नामवरसिंह यांनी शुक्रवारी येथे स्पष्ट केले.
सन्मानाची समृद्ध अडगळ
श्रेष्ठ कादंबरीकाराचा यथोचित सन्मान
‘आता कविता लेखन करणार’!
कोसला ते हिंदू व्हाया देशीवाद
ज्ञानपीठ म्हणजे काय रे भाऊ?
विशेष संपादकीय – तुकारामांच्या मराठीचा गौरव!
नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार घोषित झाल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना नामवरसिंह यांनी सागितले की, पुरस्कारासाठी नेमाडे यांची निवड करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. पुरस्कार प्राप्त व्हावा यासाठी समितीवर अनेक प्रादेशिक लेखकूंच्या माध्यमातून दबाव टाकला जात असतो. परंतु नेमाडे यांचे नाव सुरुवातीपासूनच चर्चेत होते. कारण त्यांची साहित्यसंपदा अभिजात आहे. पुरस्कार समितीने सर्व मतभेद बाजूला सारून शेवटी एकमताने भालचंद्र नेमाडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. समितीच्या सदस्यांपैकी कुणी नेमाडे यांच्या नावाला विरोध केला होता का, या प्रश्नावर ‘आधी मतभेद होते; भांडण होईल की काय, असे वाटत होते. आता मात्र पुरस्कार घोषित झाला आहे’, असे सांगत नामवर यांनी अधिक भाष्य करण्याचे टाळले.
खुद्द मराठी वाचक नेमाडे यांचे महत्त्व समजू शकले नाहीत. त्यांची कलाकृती साहित्याला अनमोल देणगी आहे. नेमाडे यांची ‘हिंदू : जगण्याची समृद्ध अडगळ’ ही कलाकृती महान आहे. ‘हिंदू’च्या हिंदी आवृत्तीची उत्सुकता असल्याचे नामवरसिंह अखेरीस म्हणाले.