जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) ९ फेब्रुवारीच्या रात्रीच्या वादग्रस्त ध्वनिचित्रफीतींसंदर्भात एक महत्त्वपूर्ण खुलासा शनिवारी पोलिसांकडून करण्यात आला. देशद्रोही घोषणा असलेल्या याच ध्वनिचित्रफितींच्याआधारे कन्हैया कुमार आणि अन्य दोघांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, या ध्वनिचित्रफीती बनावट असल्याचा आरोप कन्हैया कुमार यांच्याकडून करण्यात आला होता. मात्र, या ध्वनिचित्रफिती खऱ्या असल्याचे सीबीआयच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेत सिद्ध झाल्याचा दावा पोलीस दलातील सूत्रांकडून करण्यात आला आहे.
 ‘जेएनयू’तील देशद्रोही घोषणांच्या सातपैकी तीन क्लिप्समध्ये गंभीर फेरफार 
एका हिंदी वृत्तवाहिनीकडून चित्रीत करण्यात आलेली ही ध्वनिचित्रफीत, चित्रण करण्यात आलेला कॅमेरा, मेमरी कार्ड, क्लिप असलेली सीडी, वायर्स आणि अन्य उपकरणे काही दिवसांपूर्वी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. या सगळ्या तपासणीनंतर ८ जून रोजी ही क्लिप खरी असल्याचा अहवाल प्रयोगशाळेकडून दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला पाठविण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष खात्याचे पोलीस आयुक्त अरविंद दीप यांनी यासंदर्भातील अहवाल मिळाल्याचे मान्य केले असले तरी अहवालातील तपशील सांगण्यास नकार दिला. यापूर्वी दिल्ली सरकारने हैदराबाद येथील प्रयोगशाळेत पाठवलेल्या सातपैकी दोन क्लिप्समध्ये फेरफार करण्यात आल्याचे न्यायवैद्यक तपासणीत स्पष्ट झाले होते.

Story img Loader