केंद्रीय गृहमंत्र्यांचा दावा; विरोधी पक्षांकडून पुराव्यांची मागणी
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) आंदोलनामुळे राजकीय वातावरण तापलेले असतानाच आता या आंदोलनाला लष्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफीज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला आहे. राजनाथ यांच्या या दाव्यामुळे राजकीय क्षेत्रात वादाचे मोहोळ उठले असून विरोधी पक्षांनी यासंदर्भात तातडीने पुरावे सादर करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.
अलाहाबाद येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना राजनाथ यांनी जेएनयूतील आंदोलनाला हाफीज सईद याचा पाठिंबा असल्याचा दावा केला. हाफीज सईदने ट्विटरवरून पाकिस्तानी जनतेला जेएनयूतील आंदोलकांना पाठिंबा देण्याचे आवाहन केल्याच्या पाश्र्वभूमीवर राजनाथ यांनी हा दावा केला आहे.
राजनाथ यांनी हाफीजसंदर्भात दावा करताच जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी राजनाथ यांच्याकडे पुराव्यांची मागणी केली. ते म्हणाले, देशाचे गृहमंत्रीच असा गंभीर आरोप करत असतील तर प्रकरण नक्कीच गंभीर आहे. सरकारकडे याप्रकरणी पुरावेही असतील, ते त्यांनी देशासमोर सादर करावेत. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनीही यासंदर्भात सरकारने पुरावे सादर करून जनतेतील संभ्रम दूर करावेत असे आवाहन केले आहे.
दरम्यान, राजनाथ यांनी नंतर याविषयी बोलताना अशा प्रसंगी संपूर्ण देशाने एकस्वरात बोलले पाहिजे असे आवाहन विरोधकांना केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनाला लष्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफीज सईद याचा पाठिंबा आहे. देशाने ही वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे.
– राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jnu protests had let founder hafiz saeed backing rajnath singh