जवाहरलाल नेहरु विश्वविद्यालयात पाकिस्तानच्या समर्थनार्थ केलेल्या घोषणाबाजीला लष्करे तैयबा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हफीझ सईद याचा पाठिंबा होता, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज सांगितले.
राजनाथ सिंह म्हणाले की, देशविरोधी घोषणाबाजी करून देशाच्या एकतेला आव्हान देण्याचा प्रयत्न करणाऱयांना आमचे सरकार माफ करणार नाही. जेएनयूमध्ये जे काही घडले त्याला हाफिज सईदचे समर्थन होते. हा प्रकार अत्यंत दुदैवी आहे. पण देशाने हे सत्य समजून घेण्याची आवश्यकता आहे. भारतविरोधी घोषणा दिल्या जात असताना सर्व देशाने त्याविरोधात एकत्र येणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.
WATCH: ‘Unfortunate that JNU incident has been supported by LeT Chief Hafiz Saeed’, says HM Rajnath Singhhttps://t.co/Djplbeakyo
— ANI (@ANI_news) February 14, 2016
मंगळवारी दिल्लीतील जेएनयूमध्ये काही विद्यार्थ्यांनी दहशतवादी अफजल गुरु आणि जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंटचा सह-संस्थापक मकबूल भटच्या स्मरणार्थ एक कार्यक्रम आयोजित केला होता. २०१३ साली अफजल गुरूला देण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवरून विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात देशविरोधी घोषणाबाजी केली होती.