दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील(जेएनयू) देशविरोधी घोषणाप्रकरणी अखेर तीन वर्षांनी आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी आज दिल्ली पोलिसांनी पटियाला हाऊस कोर्टात दोषारोपपत्र दाखल केलं आहे. जवळपास 1200 पानांच्या आरोपपत्रात 10 मुख्य आरोपी ठरवण्यात आले असून यामध्ये जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैय्या कुमार याच्यासह, अनिर्बान भट्टाचार्य आणि उमर खालिद यांचाही समावेश आहे. कन्हैय्या कुमारनेही देशविरोधी घोषणा दिल्या होत्या, त्याला संबंधित कार्यक्रमाची आधीपासून कल्पना होती असं आरोपपत्रात म्हटलं आहे. तसंच घोषणाबाजी करतानाचा कन्हैय्या कुमारचा व्हिडीओ देखील मिळाला असल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आलाय.
दिल्लीतील जेएनयूमध्ये तीन वर्षांपूर्वी 9 फेब्रुवारी 2016 रोजी विद्यार्थी संघटनांनी देशविरोधी घोषणाबाजी केल्याचा आरोप आहे. संसदेवर हल्ल्या करणारा दहशतवादी अफझल गुरूच्या समर्थनार्थ येथे घोषणाबाजी झाली आणि या संघटनेचं नेतृत्व कन्हैय्या कुमार यांनी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे विद्यापीठ आवारातील या आंदोलनासाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. याप्रकरणी तब्बल 3 वर्षांनी आज दोषारोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. त्यामध्ये कन्हैय्या कुमारसह 10 जणांची नावे आहेत.
पोलिसांनी याप्रकरणी कन्हैय्या कुमारसह इतरांना अटक देखील केली होती. त्यानंतर देशाचं राजकारण ढवळून निघालं होतं. यावरुन भाजपावर मोठी टीकेची झोड उठली होती.